सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी व्यक्त केल्या भावना; संघर्ष, जिद्द आणि धडाडीच्या जोरावर शिखर गाठणाऱ्या राणे यांच्या कार्याचा गौरव
कणकवली (प्रतिनिधी) :
“शून्यतून विश्व घडवणारा नेता म्हणजे खासदार नारायण राणे साहेब” अशा शब्दांत आदरणीय खासदार नारायण राणे यांना त्यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मनस्वी आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
राणे साहेबांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातून त्यांनी आपला प्रवास सुरू केला. मुंबईत येऊन त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत राजकारणात पाऊल ठेवले. त्यानंतर आमदार, महसूल मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राज्यसभा खासदार, केंद्रीय मंत्री आणि सध्या खासदार अशी विविध महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. हा त्यांचा प्रवास म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचे आणि जिद्दीचे द्योतक मानावे लागेल.
राणे साहेब हे प्रचंड धडाडीचे आणि धाडसी निर्णय घेणारे नेता म्हणून ओळखले जातात. सभागृहात त्यांच्या उपस्थितीत “पिनड्रॉप सायलेंस” निर्माण होत असल्याचे अनेकदा सांगितले जाते, यावरूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची दखल आणि आदरयुक्त भीती लोकप्रतिनिधींमध्ये होती, हे स्पष्ट होते.
त्यांनी केवळ पदे भूषवली नाहीत, तर त्या पदांची शान वाढवली, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. राजकारणाला व्यवसाय म्हणून न पाहता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि अनेक कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले, हे त्यांच्या कार्यातील वेगळेपण अधोरेखित करणारे आहे.
तसेच, आपल्या जन्मभूमीवर असलेले त्यांचे अपार प्रेम ही त्यांची खास वैशिष्ट्ये आहेत. अनेक वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीत अनेक नेते पाहिले असले तरी आपल्या जिल्ह्यावर जीवापाड प्रेम करणारे नेतृत्व म्हणून राणे साहेब यांचे वेगळेपण जाणवते. त्यांच्या सहवासाचा लाभ मिळणे हे भाग्य असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
राणे साहेब यांच्या दैदीप्यमान व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना “समुद्राची शाई आणि आभाळाचा कागद केला तरी ते अपुरेच ठरेल” अशा भावना व्यक्त होत आहेत. आज ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या ज्येष्ठ नेत्याला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देताना सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
“राणे साहेब, आपण आरोग्यदायी आणि शतायुषी व्हा!” अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. 🙏
