३० एप्रिलपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा – सुरेश बापर्डेकर
मालवण / (प्रतिनिधी):
मालवण तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या देवी केळबाई मंदिर ते तारकर्ली देवबाग (प्र. जि. मा. २८) या रस्त्याची दोन्ही बाजूंनी झालेल्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून वारंवार अपघात घडत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर हा रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
जल जीवन मिशन आणि भूमिगत विद्युत वाहिनीसाठी महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी मोठे चर पडले असून वाहनं रुतत आहेत. ग्रामस्थांनी काही वेळा स्वखर्चाने खड्डे भरूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
बापर्डेकर यांनी पुढे म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वीच तयार झालेला हा रस्ता पुन्हा खराब झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नेव्ही डे कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती, मात्र त्यानंतर पुन्हा रस्ता खोदून काम अपूर्णच ठेवण्यात आले आहे.
सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खचलेली स्थिती, मधोमध खोल चर आणि पावसाळ्याच्या तोंडावर असलेली परिस्थिती यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. यामुळे वाहन चालक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महावितरण व जल जीवन मिशनच्या कामांसाठी आवश्यक निधी व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही रस्ता दुरुस्तीची निविदा प्रक्रिया का राबविण्यात आलेली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पावसाळ्यापूर्वी हा रस्ता खडीकरण व हॉट मिक्स डांबरीकरण करून पूर्ववत करावा, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
