You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून संगणकीकरणात उल्लेखनीय यश
Oplus_16908288

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून संगणकीकरणात उल्लेखनीय यश

२२७ पैकी २१४ संस्था ERP प्रणालीवर; १००% HOC पूर्ण, २१३ संस्थांमध्ये डायनॅमिक डे-एंड प्रक्रिया कार्यान्वित

 

सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग अंतर्गत कार्यरत प्राथमिक सेवा सहकारी संस्थांच्या संगणकीकरण प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करण्यात आले असून, सहकार क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाचा आदर्श निर्माण झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २२७ पैकी २१४ प्राथमिक संस्था संगणकीकरणाच्या पहिल्या टप्प्यात असून, त्यापैकी सर्व २१४ संस्था ERP प्रणालीवर कार्यरत झाल्या आहेत. तसेच Hand Over Certificate (HOC) चे कामही १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय, २१३ संस्थांमध्ये डायनॅमिक डे-एंड प्रक्रिया यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने आणि नाबार्डने संगणकीकरण योजनेच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व २१४ संस्थांना E-PACS म्हणून घोषित केले आहे.

या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महाराष्ट्र राज्यातील ३३ मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वाधिक डायनॅमिक डे-एंड असणारी बँक म्हणून ९.९९ स्कोअर नोंदवत अव्वल स्थान पटकावले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज सुरू असून, संस्थांच्या सचिवांना यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

संगणकीकरणामुळे संस्थांचा कारभार अधिक गतिमान, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनत चालला आहे. या उपक्रमामुळे सहकार क्षेत्रात डिजिटल परिवर्तन घडून येत असून ग्रामीण भागातील शेतकरी व सभासदांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.

संगणकीकरणामुळे संस्थांच्या दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता वाढली असून, कर्ज वितरण, वसुली, ठेवी व लेखा व्यवस्थापन अधिक जलद आणि अचूक झाले आहे. तसेच सभासदांना त्यांच्या खात्याची माहिती तत्काळ उपलब्ध होत असल्याने बँकेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

या यशामागे बँकेचे नोडल अधिकारी श्री. वसंत हडकर, त्यांचे सहकारी कर्मचारी तसेच संस्थांचे सचिव, SI टीमचे प्रमुख महेश पारधी व सहकारी, सहकार खात्याचे मा. जिल्हा उपनिबंधक श्री. बाळ परब व त्यांचे सहकारी, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक सौ. दिपाली माळी, तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मोलाचे योगदान आहे. या सर्व टीमला बँकेच्या संचालक मंडळाने दिलेली साथ, समन्वयित व नियोजनबद्ध प्रयत्न यामुळे हे यश शक्य झाले असून, सहकार क्षेत्रातील डिजिटल क्रांतीची ही वाटचाल पुढील काळात अधिक बळकट होईल, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष मा. मनीष दळवी यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा