You are currently viewing फोंडाघाटमध्ये दुसराही पूल पाडला

फोंडाघाटमध्ये दुसराही पूल पाडला

फोंडाघाटमध्ये दुसराही पूल पाडला; नागरिकांचा संताप, १ मेपासून आमरण उपोषणाचा इशारा

बाजारपेठेजवळील पूल हटवल्याने अपघाताची भीती; वाहतूक विस्कळीत, नागरिकांना वळसा घालून प्रवास

फोंडाघाट : प्रतिनिधी

फोंडाघाट येथील इंग्रजकालीन ऐतिहासिक पुलानंतर आता दुसराही पूल पाडण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या कामासाठी स्थानिक फोंडाघाटवासीयांनी प्रशासनाला सहकार्य केले असून, काहींना मोठा त्यागही करावा लागला आहे. या पुलाच्या कामासाठी भोगटे यांचे घरही पाडावे लागले आहे.

“हायवे रुंदीकरणासाठी बाजारपेठेजवळील पूल पाडला; अपघाताची भीती वाढली”

महामार्गाच्या रुंदीकरणासाठी बाजारपेठेजवळील पूल हटवण्यात आला आहे. मात्र, पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वाहतुकीवर परिणाम; नागरिकांची गैरसोय वाढली

पूल पाडल्यामुळे बाजारपेठेत येण्यासाठी आता गावाला वळसा घालून यावे लागत आहे. त्यामुळे प्रवासाचे अंतर वाढले असून, रिक्षाचालकही वाढीव भाडे आकारत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी

पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पूल आणि रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१ मेपासून आमरण उपोषणाचा इशारा

सर्व कामे, विशेषतः बाजारपेठेतील रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास १ मे रोजी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा