ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे तंत्रज्ञान व नवीन कौशल्ये आत्मसात करण्यावर भर
उत्कृष्ट विभागांना ‘TECH-वारी 2.0’मध्ये सन्मान; सहभागाचे आवाहन – तृप्ती धोडमिसे
सिंधुदुर्गनगरी :
केंद्र सरकारचा क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यभर ‘महा-साधना सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी व तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा पूर्णपणे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हा सप्ताह राबविण्यात येत असून या कालावधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘iGOT कर्मयोगी भारत’ पोर्टलवर लॉग इन करून ७ दिवसांत किमान ४ तासांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
या प्रशिक्षणातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ करण्याच्या पद्धती शिकता येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
या सप्ताहात सहभागी होत असताना अधिकारी व कर्मचारी आपले नियमित कामकाजही सांभाळणार असल्याने कामावर परिणाम न होता त्यांची कौशल्यवृद्धी साध्य होणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे तीन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना ‘एआय दक्ष’ बॅज तर मार्केटप्लेसवरील विस्तारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना ‘कर्मयोगी उत्कर्ष’ बॅज प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना ‘TECH-वारी 2.0’ अंतर्गत सन्मानित करण्यात येणार आहे.
हा उपक्रम शासकीय कामकाजाची गती आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
