*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*परतफेड*
एक दिवस माझी मैत्रीण मधल्या सुट्टीतला डबा खाताना म्हणाली होती,” “अगं! काल मी तुझा डबा खाल्ला ना आज तू माझा खा म्हणजे मग होईल की फिट्टमफाट!”
‘फिट्टमफाट’ या शब्दाचा अर्थ वाढत्या वयाप्रमाणे उलगडत उलगडत ‘परतफेड’ या शब्दापाशी येऊन रुतला तेव्हा भान आले,”खरंच की “फिट्टमफाट” म्हणजे एक प्रकारे परतफेडच नाही का? “मी तुला दिलं तसंच तूही मला दिलंस.” म्हणजेच परतफेड.
पण परतफेड या शब्दात त्या “फिट्टमफाट” शब्दातलं बाल्य, निरागसता नाही. परतफेड मध्ये असतो भार, ओझं, कर्ज . एकूणच या शब्दाभोवती गुंफलेल्या छटा वेगवेगळ्या जाणवतात. परतफेडीत जशी कृतज्ञता असते तशीच अंतस्थ कुठेतरी कुणाच्यातरी उपकारातून एकदाचे सुटल्याची” धुम्मसही असते. भौतिक ऋणातून मुक्त झाल्याचा निश्वास असतो.
परतफेड व्यावहारिक असते, भावनिक शारीरिकही असू शकते.
आर्थिक परतफेड ही व्यावहारिक असते.” घेतलेलं दिलं अगदी व्याजासहित परत केलं” ही भावना असते.
भावनिक परतफेड ही काहीशी उच्च स्तरावर असते. सुदाम्याच्या पोह्यासारखी.मित्र प्रेम व्यक्त करणाऱ्या सुदाम्याने कृष्णाला मूठभर पोहे दिले आणि कृष्णाने सुदामाला सोन्याची द्वारका बहाल केली.
कृष्णाच्या बोटाची भळभळणारी जखम बांधण्यासाठी द्रौपदीने भरजरी शेला फाडला त्या चिंधीचे दान लक्षात ठेवून भर दरबारात कृष्णाने द्रौपदीला अखंड वस्त्रे पुरवून तिची लाज राखली अशा परतफेडीच्या मागे निरपेक्षता असते.दिल्या घेतल्याची भावना नसून केवळ भावनिक नात्याची घट्ट वीण असते.”तू तर इतकंच दिलंस त्या बदल्यात मी बघ केवढं दिलं!” हा गणिती व्यवहार नसतो.
शारीरिक परतफेड ही काही ठिकाणी घृणास्पद असू शकते पण काही ठिकाणी मात्र त्यात पराकोटीचा सेवाभावही दडलेला असतो. एखादी वृद्ध,असहाय अपंग माता तिची शुश्रुषा करणार्या मुलीला प्रेमाने म्हणते,” जशी काय आता तूच माझी माय झाली आहेस.भूमिकांची बघ कशी अदलाबदल झाली.”
मग लेकही म्हणते “आई! तू आमच्यासाठी किती गं झिजलीस आता आम्हालाही करू दे ना तुझं.” या परतफेडीत मात्र अत्युच्च असा अंत:करणातला प्रेमभाव झिरपत असतो जो जीवनात सुंदर रंग भरतो. पण त्याचवेळी विरोधाभासात असंही ऐकतो, ”चांगले पांग फेडलेस रे बाबा तू आमचे” यात नैराश्य,उपहास,दु:ख, कारुण्य जाणवतं.
“परतफेड” हा शब्द खूप व्यापक आहे बहुरंगी,, बहुरुपी,निरपेक्ष आणि अपेक्षार्थी, सकारात्मक तितकाच नकारात्मकही आहे. जितका सुदर तितकाच असुंदरही. हा पंचवर्णीय शब्द पंचभूतांचे दर्शनच देतो जणू काही.
राधिका भांडारकर
