You are currently viewing पोलिसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस 3 वर्षांची शिक्षा…

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस 3 वर्षांची शिक्षा…

*पोलिसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस 3 वर्षांची शिक्षा…*

कुडाळ (सिंधुदुर्ग) :

कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक 256/2023 मधील प्रकरणात पोलिसांच्या काटेकोर तपासामुळे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. विशेष सत्र खटला क्रमांक 11/2024 मध्ये मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांनी हा निकाल दिला.

या प्रकरणात फिर्यादी सुधीर पिलाजी धामणकर (वय 29), व्यवसाय आरोग्य सेवक, रा. सिद्धार्थनगर, पंदूर (ता. कुडाळ) यांनी तक्रार दिली होती. आरोपी सुरज आनंद जाधव (वय 29, रा. पंदूर सिद्धार्थनगर, ता. कुडाळ) याच्यावर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 353, 332, 352 व 504 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.

घटनेची पार्श्वभूमी :
फिर्यादी हे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणाच्या कामानिमित्त सिद्धार्थनगर परिसरात गेले होते. यावेळी आरोपीच्या झोपडीसमोर पोहोचताच आरोपीने “तुम्ही माझ्या पत्नीबद्दल चुकीची माहिती का दिली?” असा जाब विचारत संतापाच्या भरात फिर्यादीवर हल्ला केला. शिवीगाळ करत त्याने दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत केली. यामुळे शासकीय कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण झाला.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. आर. कऱ्हाडकर यांनी केला. तपासादरम्यान पुरावे व साक्षीदार सादर करून गुन्हा सिद्ध करण्यात आला.

न्यायालयाचा निकाल :
मा. न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी आरोपी सुरज जाधव यास दोषी ठरवत 3 वर्षे कारावास व 9,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल 27 मार्च 2026 रोजी देण्यात आला.

या खटल्यात सरकारी अभियोक्ता संदीप अशोक राणे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

या प्रकरणामुळे पोलिसांच्या सक्षम तपासाची पुन्हा एकदा प्रचिती आली असून शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणार असल्याचा संदेश समाजात गेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा