२९ मार्च २०२६ रोजी “बकुळीची फुले” या श्री दिपक पटेकर यांच्या पहिल्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे; त्या निमित्ताने दोन शब्द…
पहिलं प्रेम… पहिलं अपत्य… आणि पहिलं पुस्तक…
या तिन्ही अनुभवांत एक विलक्षण साम्य असतं.. ते म्हणजे धडधडणाऱ्या मनाचं, न सांगता येणाऱ्या उत्कंठेचं आणि उगाचच डोळ्यांत दाटणाऱ्या आनंदाचं, भावनांच..! जसं पहिलं प्रेम मनात अलगद उमलतं, पहिलं अपत्य हातात घेताना जीव भरून येतो, अगदी तसंच पहिलं पुस्तक हातात येण्याची प्रतीक्षा लेखकासाठी शब्दातीत असते. त्या प्रतीक्षेत स्वप्नं असतात, काळजी असते, थोडीशी भीतीही असते अन् हूर हूर पण.. याबरोबर सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मनाचा पहिल्यांदाच जगाशी होणारा परिचय असतो.
श्री.दीपक पटेकर (दिपी) यांचा “बकुळीची फुले” हा पहिला काव्यसंग्रह अशाच भावविश्वातून आकाराला आलेला आहे. बकुळीचं फूल जसं लहानसं, नाजूक, पण विलक्षण सुगंधी असतं, तसं पहिल्या काव्यसंग्रहाचंही असतं. त्यात मोठेपणाचा आव नसतो; असते ती मनाच्या कोपऱ्यात जपलेली साधी, निर्मळ आणि मनस्वी भावना.
लेखकाच्या मनात कवितांची बीजं नकळत पडत असतात. कधी एखाद्या संध्याकाळी, कधी पावसाच्या सरींमध्ये, कधी एखाद्या आठवणीच्या हळव्या वळणावर त्या बीजांना शब्दांचा अंकुर फुटतो आणि एक दिवस त्या कवितांचं झाड बहरतं. त्याच प्रतिक म्हणजे “बकुळीची फुले”. हा काव्यसंग्रह म्हणजे अशाच आठवणींच्या, भावनांच्या आणि अनुभवांच्या झाडावर उमललेली सुगंधी फुलं आहेत असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पहिलं पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी लेखकाची मनःस्थिती विलक्षण असते. जणू काही आपल्या मनातल्या सगळ्या गुपितांचा पहिल्यांदाच उलगडा होणार असतो. “लोकांना आवडेल का?”, “माझे शब्द त्यांच्या मनाला भिडतील का?”, “या कवितांमध्ये त्यांना स्वतःचा चेहरा दिसेल का?” अशा एक ना असंख्य प्रश्नांची घालमेल मनात सुरू असते. पण, त्याचवेळी एक आनंदही असतो आपली स्वप्नं आता कागदावरून उडणार आहेत, वाचकांच्या हृदयात घर करणार आहेत याचा…
“बकुळीची फुले” हा संग्रहही अशाच पहिल्या स्पंदनांचा साक्षीदार आहे. बकुळीच्या फुलांचा सुगंध जसा मंद असतो पण चिरकाल टिकतो, तसाच या कवितांचा आशयही वाचकांच्या मनात अलगद रेंगाळणारा असेल, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे. यात प्रेम असेल, विरह असेल, नात्यांची ऊब असेल, आयुष्याच्या वाटेवर भेटलेल्या क्षणांची नोंद असेल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एका कवीच्या मनाचं पहिलं, निरागस प्रेम दर्शन असेल…
पहिलं प्रेम जसं आयुष्यभर विसरता येत नाही.., पहिलं अपत्य जसं मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात घर करून राहतं, अगदी तसंच पहिलं पुस्तकही लेखकाच्या आयुष्याचा अविस्मरणीय टप्पा ठरत असतो. या पुस्तकात परिपूर्णतेपेक्षा प्रामाणिकपणा अधिक असतो. शब्दांच्या अलंकारांपेक्षा भावनांची उब जास्त असते. आणि म्हणूनच पहिल्या काव्यसंग्रहाचं स्थान नेहमीच वेगळं, खास आणि जपून ठेवावं असं असतं.
२९ मार्च हा दिवस श्री.दीपक पटेकर (दिपी) यांच्यासाठी फक्त प्रकाशनाचा दिवस नाही; तो त्यांच्या स्वप्नांना पंख फुटण्याचा दिवस आहे. आजवर मनात जपलेली प्रत्येक कविता, प्रत्येक भावना, प्रत्येक शब्द — आता वाचकांच्या हातात जाणार आहे. जणू बकुळीची फुले वाऱ्यावर उधळली जातील आणि त्यांचा सुगंध अनेकांच्या मनात दरवळेल. कविता ही मुळात मनाचा संवाद असते. लेखक आणि वाचक यांच्यातील एक शांत, नि:शब्द भेट. “बकुळीची फुले” हा संग्रहही अशाच भेटीचं निमित्त ठरेल. या फुलांचा सुगंध कुणाला पहिल्या प्रेमाची आठवण करून देईल, कुणाला हरवलेल्या क्षणांचा स्पर्श देईल, तर कुणाला नव्या आशेची चाहूल देईल.
पहिलं पुस्तक म्हणजे लेखकाच्या प्रवासाची सुरुवात असते. या प्रवासात पुढे कितीतरी ऋतू येतात, अनुभवांची अनेक वादळं येतात, शब्दांची परिपक्वता वाढत जाते. पण पहिल्या संग्रहाचा निरागस सुगंध कायम राहतो अगदी बकुळीच्या फुलांसारखा.
“बकुळीची फुले” या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त श्री. दीपक पटेकर (दिपी) यांना मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या शब्दांचा हा सुगंध अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचो, त्यांच्या कवितांना मनाची ऊब मिळो, आणि या बकुळीच्या फुलांनी साहित्यविश्वात आपली खास ओळख निर्माण करावी हीच शुभेच्छा.
कारण…
पहिलं प्रेम विसरत नाही…
पहिलं अपत्य दूर जात नाही…
आणि पहिलं पुस्तक —
ते तर कायमच मनात सुगंध बनून राहातं…
अगदी “बकुळीची फुले” सारखं.
बाकी पुस्तक वाचल्यावर सविस्तर लेखन करेलच..
श्रीकांत धारकर
बुलढाणा
9422184336
