*सावंतवाडी येथील ज्येष्ठ कवी श्री.मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”रघुनंदन श्रीराम”*
श्रीरामांना घडून गेला,
राम युगी वनवास
कलियुगी ही पुन्हा भोगला,
कितीक हा विजनवास. /१/
पुरुषोत्तम ते रामचंद्र प्रभू
शांत,संयमी, लोभसवाणे
सत्व परीक्षा, अन् उपेक्षित ती,
सीतामाईचे काय जीणे. /२/
कितीक आली साम्राज्ये अन्
कितीक झाल्या स्वा-या
शरयू सरिता वाहून नेई
अनंत अडचणी सा-या. /३/
जीथे जन्मले “श्रीरघुनंदन”
कौसल्या सुत, दशरथ नंदन
शरयू तटाकी, अयोध्या नगरी
समस्त देवगण,करीती वंदन. /४/
तुटले जोखड, परकियांचे
परी खंत मनी एक
धारातिर्थी पडले येथे
श्रीराम भक्त नेक. /५/
ध्वज श्रीरामांचा, घेऊनी आला
कर्मठ,जिद्दी एक तपस्वी
आज मितीला पूर्ण जाहले
मंदिर पूर्ण यशस्वी. /६/
सजली भारत भूमी सजली
सजली अयोध्या नगरी सजली
“शरयू” जलाची अवखळ खळखळ
“राम” नामे पिके फुलवली. /७/
साग्रसंगीत इथे जाहली,
श्रीराम प्रतिष्ठापना
वर्णन करण्या,शब्द न सुचती
उणी कवि कल्पना. /८/
कुण्या जन्मीचे, भाग्य म्हणूनी
जन्म इथे जाहला
याची देही, याची डोळा
“श्रीराम “आम्ही पाहिला. /९/
वेदघोष, अन् मंत्रघोष ते
ब्राह्म मुहूर्ती सुरु जाहले
सनई मधूनी सुस्वर येती
विश्व सारे भारले /१०/
ज्या शिळेतून,घडली येथे
श्रीराम- सीतामाई
धन्य आपण झाले म्हणूनी
शिळा हर्षून जाई. /११/
आंजनेय श्री हनुमंतांची
श्रीराम चरणी सदैव भक्ती
रामभक्त श्री हनुमंताची
तिन्ही लोकी ख्याती. /१२/
श्रीराम सखा” हनुमंताचे”
“हनुमान गढी” आहे स्थान
प्रथम दर्शन”हनुमंताचे”
“श्रीराम” दर्शना मग प्रस्थान. /१३/
“न भूतो न भविष्यती”
ऐसा सोहळा जाहला
श्रीरामांची छबी पाहूनी
प्रेमाश्रूं ही, मुक्त वाहला. /१४/
होईल सार्थक नर जन्माचे
भक्ती सुमन”श्रीरामा” वाहू
रघुनंदन श्रीराम-सीतेला
नयनी आज साठवू. /१५/
जळो सा-या “पापराशी”मत
थोडे पुण्य होऊदे
“श्रीराम जयराम जय जय राम”
सोबत शेवटी असूदे. /१६/
कितीक सोसले,प्रहार तेव्हा
बनली”शिळा”राघव रुप
प्रभू रामांच्या पदस्पर्शाने
“शिळेस” दिधले अहिल्या रुप /१७/
भक्तीरसांनी आकंठ भरली
भासे ” अयोध्या” स्वर्ग जणू
श्रीरामा मी तुम्हा अर्पितो
या देहाचा अणू- रेणू. /१८/
तव चरणांवरी” काव्यपुष्प” हे
माला बनवून वाहण्या
श्री सरस्वती ने शब्द सुचविले
“श्रीगणेश”देई शक्ती लिहीण्या. /१९/
क्षमा याचना करुनी आता
संत- महात्मा आणि श्रीरामा
शब्द- मंजिरी, काव्यकुसुमा
स्वीकार करावा, हे प्रभूरामा. /२०/
रचना:— मोहन मराठे…
