You are currently viewing ! चैत्र गुढीपाडवा !

! चैत्र गुढीपाडवा !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*! चैत्र गुढीपाडवा !*

 

सोनपिवळ्या किरणांनी

आले नवीन वर्षे

नवं वर्षाचा हर्ष

मनोमनी दाटे. .!!

निसर्गाचा आदर करण्यासाठी मराठी महिन्यातला पहिला महिना चैत्र

चैत्र पाडवा…म्हणजेच गुढीपाडवा.

साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा मराठी नवीन वर्षातला पहिला सण हिंदू कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात.. नवीन वर्ष, नवीन संकल्प. …चैत्र महिना म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येते ती झाडांना फुटलेली पालवी…

भारतीय सण हे आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत.. भारतातील प्रत्येक सणाचे आपले धार्मिक महत्व, पावित्र्य आणि इतिहास आहे आणि अश्याच काही सणांपैकी एक सण

म्हणजे गुढीपाडवा…

गुढीपाडव्यापासून सुरु होणारे सण चैत्र गौरीचे आगमन त्यासाठी अंगणामध्ये रेखाटलेलं सुंदर चैत्रांगण, राम नवमी, अक्षय्य तृतीया…दारावरती लावलेलं झेंडूच्या फुलांचं आंब्याच्या पानांचे तोरण, नवीन खरेदी, घरोघरी उभारलेली गुढी… एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता वातावरणात असते.

तिच्या स्वागतासाठी अंगणात काढलेली रांगोळी चित्रे म्हणजेच चैत्रांगण..

फाल्गुनाचा निरोप घेत अलगद येऊ घातलेल्या चैत्राचं निर्सगाने केलेलं एक सुंदरस खुलं असं स्वागत. .निसर्गच नाही तर अवघं चराचर चैत्राचं स्वागत करायला उत्सुक असतं. .

गीष्मऋतूतही वाळलेल्या झाडाला कोवळा कोंब फुटतो व बघता बघता हिरवाई सळसळते. कोवळ्या पालवीने भारावलेली झाडे वार्‍याचे बोट पकडून डोलू लागतात. रंगीबेरंगी फुले आनंदाने नाचू लागतात. पक्षांचा किलबिलाट सुरू होतो व तो आपल्या कानांना तृप्तीचे काही क्षण देऊन जातो. सृष्टीचा हा नवनिर्मितीचा काळ. .या नवनिर्मितीचे वसंतोत्सवात आगमन होते व सर्वत्र आनंदाची हर्षाची गुढी उभारली जाते. .

चित्रा या नक्षत्रावरून वर्षातल्या या पहिल्या महिन्याला चैत्र असं संबोधलं जातं. हिंदू या पंचांगानुसार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो. या चैत्रापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतलं मानाचं पानं म्हणजेच ही गुढी. .!!

ब्रम्हदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. गुढीपाडवा हे संकल्प शक्तीचे गुढत्व दर्शविते. “आमचे प्रत्येक पाऊल आमच्या समृद्धी करता आता पुढेच पडत राहील ” असे प्रतिपदा सांगते म्हणून या दिवशी शुभसंकल्प केल्यास तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. याकरिताच सत्य संकल्पाची गुढीची मुहूर्तमेढ रोवायची असते. गुढी म्हणजे नावीन्य, स्वागतशीलता नवनिर्मितीची प्रेरणा उत्साह आनंद. …!!

चैत्र महिन्यांत जर आपण

सभोवतालच्या सृष्टीचे अवलोकन केले तर असे लक्षात येत की, शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ, निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव पालवीने फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल ही कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सु-स्वराने लागलेली असते. निसर्गातल्या परिवर्तनाचा, नवे चैतन्याचे, नवे सृष्टीचे स्वागत दारी गुढी लावून करायचे हा पण त्या मागचा एक उद्देश आहे.. सुगंधी फुले जसं वातावरण सुगंधीत प्रफुल्लित करतात तसं प्रत्येकाच्याही आयुष्यात प्रेमाचा सुगंध मायेचा सुगंध असाच दरवळावा असं यातून सुचित होत असतं म्हणून नववर्षाच्या निमित्ताने आपण सर्वांनी नवकल्पनांच्या, नवविचारांच्या उत्तुंग अश्या गुढ्या उभारूया व मंगलमय संस्कृतीचं तोरण बांधूया. ..!

चैत्र शुध्द प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील फार महत्व आहे. या दिवशी मीठ, हिंग, ओवा, मिरी, साखर आणि कडुलिंबाच्या पानांना एकत्र करून तिची गोळी तयार केली जाते आणि तिचे सेवन केले जाते. यामुळे पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वेचेचे आरोग्य सुधारते त्यामुळे या गोळीचे आयुर्वेदात अतिशय महत्व सांगितले आहे. त्याचप्रमाणे कडुलिंबाची पानं या दिवसांमधे अंघोळीच्या पाण्यामधे टाकुन स्नान करणे चांगले मानले गेले आहे.. इतकचं नाही तर गुडीपाडवाचे आध्यात्मिक, नैसर्गिक आणि सामाजिक महत्त्वही आहे..

गुढीचा आकार हा मानवी शरीर प्रतीत करतो. गुढीवरील कलश हा गोलाकार असून तो मानवी मस्तक आणि बांबू हा माणसाचे शरीर किंवा पाठीचा कणा दर्शवितो…

गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे हे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. पाडव्याच्या दिवशी सुरु केलेली कामे यशस्वी होतात असे मानले जाते..असेही मानले जाते कि जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस गुढीपाडव्याचा होता आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरुवात झाली त्यामुळे गुढीपाडव्याला आध्यात्मिक महत्व आहे…

चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होते आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी

कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. जी मानवी शरीरासाठी अतिशय लाभदायी आहेत. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने शरीराला थंडावा मिळतो. कडुलिंब पित्ताचा नाश करते आणि त्वचेसाठीही अतिशय

लाभदायकही असतात..

गुढीपाडव्याच्या दरम्यान हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते..

गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आपल्या पारंपरिक पोषाखामध्ये एकत्र जमतात व एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.

संस्कृतीच्या क्षितीजावर

उजळून आली

नवी पहाट. .!

क्षण मोलाचे

घेऊन आली

पुन्हा नव्याने आयुष्यात..!

क्षण ते सारे

वेचून घेऊ

नववर्षे आनंदे

साजरे करू. ..!!!

दरवर्षी आपण नव्या वर्षाचे स्वागत करतो. नव्या संकल्पना करतो. यंदा निसर्गाशी प्रतारणा न करता पर्यावरणपूरक वागण्याचा संकल्प करूया… निसर्ग प्राणी संपदा यांचे रक्षण केले तरच मानवजातीची आरोग्यदायी गुढी उभी करू शकू…

निसर्गातील बदल सुखावहपणे मानवाच्या समोर आल्हादकपणे ठेवणारा यंदाचा गुढीपाडवा सर्वांनाच आरोग्यसंपदेचं दान देणारा ठरो हीच मनोकामना… !!

साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ दिवस आणि नववर्षांचा आरंभ दिन म्हणून गुढीपाडव्याचे महत्त्व अबाधित राहणार आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा पाडव्याचा मुहूर्त आणि गुढीपाडव्यापासून सुरू होणारे नवीन संवत्सर सुखाचे जावो ही सर्वाना शुभेच्छा!

 

लेखिका /कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे @

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा