You are currently viewing देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा

देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा

देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा

अधिक मासानिमित्त २४ मे ते ३१ मेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

मालवण :

मालवण शहरातील देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरात अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २४ मे २०२६ ते रविवार दि. ३१ मे २०२६ या कालावधीत हा सप्ताह सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
या सोहळ्याअंतर्गत दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्रीमद् भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये संहिता वाचन, श्री विष्णू देवतेस सहस्र तुलसीदल अर्पण पूजाविधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्र नामावलीसह देवीला कुंकूमार्चन तसेच आयोजकांकडून ५ ते ९ वर्षे वयोगटातील कुमारिकांचे पूजन करण्यात येणार आहे. हे सर्व धार्मिक विधी पूर्णपणे निःशुल्क असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
तसेच पुणे येथील सुप्रसिद्ध निरुपणकार प्रणव गोखले यांचे दररोज सायंकाळी ४:३० ते ८:३० या वेळेत श्रीमद् भागवत महापुराणातील कृष्णलीलांवर मराठीतून निरूपण होणार आहे.
सोमवार दि. १ जून २०२६ रोजी मूर्ती विसर्जन मिरवणुकीने सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे.
या सप्ताह सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. सचिन वझे, सौ. प्रीती वैद्य, श्री. गजानन अभ्यंकर आणि सौ. शुभदा अभ्यंकर यांनी केले आहे. श्री देव नारायण मंदिराचे नित्य पुरोहित श्री. सुमेध जोशी यांचेही या सोहळ्यासाठी विशेष योगदान लाभत आहे.
या धार्मिक सोहळ्यास मालवण ग्रामदेवतांचे आशीर्वाद, देवस्थान विश्वस्त, मान्यवर, समस्त गावकर मंडळी यांचे सहकार्य तसेच बाळगोपाळ मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा