आचरामार्गे अक्कलकोट बस फेरीचा शुभारंभ; भाविक व प्रवाशांची सोय सुलभ
मालवण :
भाविकांची व प्रवाशांची दीर्घकालीन मागणी पूर्ण करत आचरामार्गे अक्कलकोट बस फेरीचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी मालवण येथून करण्यात आला. आचरा येथे बस दाखल होताच सरपंच जेरॉन फर्नांडिस व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी सरपंचांच्या हस्ते नारळ वाढवून आचरा येथून फेरीचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी माजी सरपंच चंदन पांगे, उपसरपंच संतोष मिराशी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक कांबळी, माजी उपसभापती अशोक बागवे, दिलीप कावले, प्रविण आचरेकर, निवृत्ती आचरेकर, आचरा कंट्रोलर दिनेश साळकर, वाहक एस.डी. कांबळे, चालक ए.एन. गव्हाणे यांच्यासह आचरेकर, भरत पटेल, किशोर आचरेकर, शैलेश राणे, दिनेश कांबळी, प्रशांत सावंत आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ही बस फेरी मालवण येथून दुपारी ३.४५ वाजता सुटून आचरा येथे सुमारे ४.३० वाजता पोहोचते. त्यानंतर कणकवली, गगनबावडा, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर मार्गे अक्कलकोटकडे प्रस्थान करते. परतीची फेरी अक्कलकोट येथून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता सुटणार असल्याची माहिती आचरा कंट्रोलर दिनेश साळकर यांनी दिली.
ही बस सेवा सुरू करण्यासाठी माजी सरपंच चंदन पांगे यांनी विशेष प्रयत्न केले असून निवृत्ती आचरेकर, प्रवीण आचरेकर, महेंद्र मांजरेकर, नरेश तारकर, विजय पांगे तसेच परिसरातील सर्व ग्रामपंचायतींचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
