वेळागर किनाऱ्यावर महाकाय डॉल्फिन मृतावस्थेत; परिसरात खळबळ
वेंगुर्ला
तालुक्यातील शिरोडा येथील वेळागर समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळच्या सुमारास सुमारे ८ ते ९ फूट लांबीचा एक महाकाय डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. हा डॉल्फिन ‘सी हॉर्स हॉटेल’समोरील समुद्रकिनाऱ्यावर लाटांसोबत येऊन अडकलेला दिसून आला.
सकाळी स्थानिक नागरिक फेरफटका मारत असताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच डॉल्फिन पाहण्यासाठी स्थानिक नागरिक व पर्यटकांनी किनाऱ्यावर मोठी गर्दी केली.
समुद्री जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असलेल्या या डॉल्फिनच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नैसर्गिक कारणे, समुद्रातील वाढते प्रदूषण किंवा मासेमारीच्या जाळ्यात अडकल्यामुळे मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती संबंधित प्रशासन व मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आली असून पंचनामा व तपासानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. समुद्री जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कचरा व बेकायदेशीर मासेमारीवर नियंत्रण आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
