*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ग्रीष्मा !…जातोस ना..!*
वसंता जसा जसा तू
शेवटास जातो
तसा तसा ग्रीष्मा तू
हातभर जीभ बाहेर काढतो ..
उन्हाच्या लाहीत ..ग्रीष्माच्या खाईत
पाणी दूर दूर ..पालखीतून जात
जलाशयाच्या भ्रामक दिशांनी
मृगजळ.. धावत..धावत परत येत
ग्रीष्मा ..सावली आंब्याखालची
मजेत.. लोळत असते
तुझ्या राज्यात छोटी झुळूकही
वा-याला.. गारवा देते …
तुझ्या उष्म्यांत जीणं नको होतं
तेव्हा चिंचेच झाडं डवरून येतं
लाल-पिवळ्या सानुल्या फुलांत
नटून-थटून.. नाचत सुटतं…
बाभळीवरचं ..घरटं ग्रीष्मा
दुष्काळाला.. निरोप देतो
कडुनिंबावरच घरटं.. ग्रीष्मा
भारी पावसाचा संकेत देतो ..
जातांना तू सारं कांही भविष्यातलं
या अवनीला सांगून जातो.. ग्रीष्मा
ऋतुचक्राचा तूच.. खरा राजा
काटेरी बाणावर देह टाकतो..भीष्मा
खूप कौतुक झालं…ग्रीष्मा
सूर्याचं खूप चुकतयं.निघ आता तिरिपांना आवर्ताच्या यात्रेस लोटून
लख्ख दिप्तीचे व्रत मोडून टाक आता
बाबा ठाकूर
