सावंतवाडीत १९ मार्चला ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ भव्य स्वरूपात
राजवाडा येथून यात्रेला प्रारंभ; शहरातील विविध धार्मिक-सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
सावंतवाडी
शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी आणि हिंदू नववर्षाचे स्वागत उत्साहात करणारी ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ यंदा १९ मार्च रोजी भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. सकल हिंदू समाज आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती स्वागत यात्रेचे संयोजक शैलेश पै यांनी दिली.
या स्वागत यात्रेत शहरातील विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी संघटनांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. यात्रेदरम्यान पारंपरिक वाद्यांचा गजर, भगवे ध्वज, तसेच मैदानी खेळ आणि लहान मुलांचे सांस्कृतिक सादरीकरण यामुळे वातावरण उत्साहपूर्ण होणार आहे.
या ऐतिहासिक यात्रेत आरंभ सखी, बजरंग दल, दुर्गावाहिनी, एकमुखी दत्तमंदिर ट्रस्ट, घे भरारी, गोरक्षक, हरेकृष्ण संस्कार केंद्र, हिंदू वैश्य वाणी संघटना, पाटीदार समाज, पूर्व सैनिक सेवा परिषद, रासाई कला क्रीडा मंडळ, रिक्षा संघटना, साळईवाडा मित्रमंडळ, समता महिला मंडळ, सनातन संस्था, शिवकन्या, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री रामानंद संप्रदाय नरेंद्र महाराज, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सुवर्णकार संघ, वैश्यवाडा मित्रमंडळ, वेदपाठशाळा सावंतवाडी, महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, विद्याभारती शिशुवाटिका आणि विश्व हिंदू परिषद यांसह अनेक संस्था सहभागी होणार आहेत.
१९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता ऐतिहासिक राजवाडा येथून यात्रेला प्रारंभ होणार असून नारायण मंदिर, गांधी चौक, जयप्रकाश चौक आणि शिवरामराजे पुतळा मार्गे ही यात्रा भोसले उद्यान येथे समारोपास येणार आहे. या मार्गावर पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज आणि वाद्यांच्या गजरात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे.
या यात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक शैलेश पै यांनी केले. यावेळी सहसंयोजक सौ. गायत्री देवस्थळी, आनंद साधले, विनायक रांगणेकर, सौ. विशाखा रांगणेकर आणि दिनेश गावडे आदी उपस्थित होते.
