You are currently viewing कणकवलीतील १२.६० कोटींच्या विकासकामांचे श्रेय सत्ताधाऱ्यांकडून घेतले जात असल्याचा आरोप

कणकवलीतील १२.६० कोटींच्या विकासकामांचे श्रेय सत्ताधाऱ्यांकडून घेतले जात असल्याचा आरोप

कणकवलीतील १२.६० कोटींच्या विकासकामांचे श्रेय सत्ताधाऱ्यांकडून घेतले जात असल्याचा आरोप

कामांना आमच्या कार्यकाळात मंजुरी; आता भूमिपूजन करून जनतेची दिशाभूल – समीर नलावडे, बंडू हर्णे

कणकवली
कणकवली शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे १२ कोटी ६० लाख ४३ हजार रुपयांचा निधी आमच्या सत्ताकाळात प्रस्ताव सादर करून मंजूर करून घेतला होता. मात्र आता त्या कामांचे भूमिपूजन करून सत्ताधारी मंडळी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला.
समीर नलावडे संपर्क कार्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरातील विविध विकासकामांना जिल्हा नियोजन विकास निधी, रस्ते विकास निधी आणि नगरोत्थान योजनांमधून सन २०२५-२६ साठी मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नलावडे यांनी सांगितले की, कणकवली-टेंबवाडी (हिंद छात्रालय) ते रवळनाथ मंदिर ते सुतारवाडी १२ मीटर डी.पी. रस्त्यासाठी जमीन भू-संपादन, निम्मेवाडीतील रस्ते डांबरीकरण, नरडवे रोड मोहन माळ येथे संरक्षक भिंत, शहरातील विविध भागांत गटारे, रस्ते नुतनीकरण, सोलार पथदीप, सोलार हायमास्ट, स्मशानभूमी नुतनीकरण, बगीचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा उभारणी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण यांसह अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
नगरपंचायत निवडणुकीनंतर सत्ताबदल झाल्याने आता शहराच्या विकासाची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर आहे. त्यांच्या माध्यमातून शहरासाठी निधी मिळत असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने कामांचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल केली जात असेल, तर त्याला कडाडून विरोध केला जाईल, असा इशारा समीर नलावडे यांनी दिला.
दरम्यान नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवली शहरासाठी २०० कोटी रुपयांचा विकासनिधी आणण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा प्रत्यक्षात उतरवून दाखविल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, असे आव्हानही नलावडे यांनी दिले.
प्रारूप विकास आराखड्यालाही नागरिकांचा विरोध
कणकवली शहरासाठी नगरविकास विभाग आणि नगरपंचायत विभागाने जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात सुमारे ५१० हेक्टर जमिनीवर विविध आरक्षणे टाकण्यात आली आहेत. या आरक्षणांबाबत नागरिकांमध्ये नाराजी असून काही ठिकाणी जमिनमालक आणि नागरिक उपोषणाची तयारी करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील, असेही नलावडे यांनी स्पष्ट केले. आराखड्याबाबत सूचना व हरकती नोंदविण्यासाठी २६ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून नागरिकांवर अन्याय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जनतेची दिशाभूल – बंडू हर्णे
आमच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय सध्याचे सत्ताधारी घेत असून विविध कामांची भूमिपूजने करून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी यावेळी केला.
घोषणा प्रत्यक्षात आणा – समीर नलावडे
नगराध्यक्षांनी जाहीर केलेला २०० कोटी रुपयांचा विकासनिधी शहरासाठी प्रत्यक्ष आणून दाखवावा. त्यांनी घोषणा पूर्ण केल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, असे समीर नलावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा