You are currently viewing महापुरुषांचा पराभव

महापुरुषांचा पराभव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*महापुरुषांचा पराभव*

विजय – पराभव, यश – अपयश, जिंकणं – हरणं या सर्वांमध्येच एक सूक्ष्म रेषा असते जी यशातलंही अपयश किंवा अपयशातलं यश, जिंकण्यातलं हरणं,हरण्यातलं जिंकणं ठरवत असते.

जगाच्या इतिहासात असे अनेक महापुरुष होऊन गेले, ज्यांचे विचार, कार्य किंवा लष्करी प्रतिभा विशाल असूनही त्यांना त्यांच्या अंतिम किंवा एखाद्या मोठ्या संघर्षात भीषण पराभवाला सामोरे जावे लागले.

फ्रान्सचा सम्राट *नेपोलियन बोनापार्ट* ज्याने युरोप जिंकला पण वॉटर्लूच्या लढाईत तो पराभूत झाला आणि त्याला आपले साम्राज्य गमवावे लागले.

विसाव्या शतकातील सर्वात शक्तिशाली हुकूमशहा *हिटलर* यांनी जर्मनीला एका मोठ्या युद्धाच्या खाईत लोटले पण शेवटी त्याचा स्वतःचाच पराभव झाला.

*अलेक्झांडरने* बहुतेक ज्ञात जग जिंकले परंतु भारतीय उपखंडातला प्रतिकार आणि सैन्याची झालेली दमणूक यामुळे त्याच्या विजयाची मोहीम खंडित झाली.

रोमन सम्राट *नीरो* याच्या राज्यातील अस्थिरतेमुळे त्यालाही सत्ता गमवावी लागली आणि त्याचा अंत शोकांतिक झाला.
अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि वर्णद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या *अब्राहम लिंकन* यांचाही त्यांच्याच देशात खून झाला.

गॅलिलिओ, टॉलस्टाॅय, साॅक्रेटीस यांच्यासारख्या महापुरुषांनाही प्रस्थापित सत्तेपुढे हार मानावी लागली.
*महात्मा गांधीजी* नाही पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा म्हटले जाते. वैचारिक पातळीवर ते विजयी झाले पण राजकीय स्तरावर मात्र पराभूत झाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनाही मुंबई आणि भंडाऱ्यातून दोनदा पराभूत व्हावे लागले.

मूळात महापुरुषांना विशिष्ट जातीत आणि गटात वाटल्यामुळेही ते पराभूत ठरले. त्यांच्या अनुयायांच्यातल्या स्पर्धा त्यास कारणीभूत ठरल्या.

एकंदर या सर्वांचा विचार करत असताना सहज मनात येते पराभूत असूनही या सर्व व्यक्ती मानवी मनातून दूर झाल्या नाहीत कारण एकेकाळचा इतिहास त्यांनी त्यांच्या धोरणाने घडवला होता.त्यांच्या पराभवाची कारणेही विविध होती.

मात्र *महापुरुषांचा पराभव* या विषयाचा विचार करताना, त्याची कारणे ठरवताना तो नक्की कुणामुळे आणि कशामुळे झाला याचा अभ्यास करताना, तो दोन ठळक भागात करावा लागतो एक त्यांच्या तत्त्वांचा त्यांच्याच अनुयायांकडून झालेला पराभव आणि दुसरा म्हणजे त्यांची तत्त्वेच, अति महत्त्वाकांक्षा त्यांच्या वैयक्तिक अपयशाची किंवा पराभवाची मूलभूत कारणे ठरू शकतात.

एखाद्या महान व्यक्तीचा त्यांच्या अनुयायांकडूनच कसा पराभव होतो याचा विचार करताना काही ठळक बाबी मनात उतरतात. कुठलीही व्यक्ती ही तिच्या कर्माने महान ठरते. प्राप्त परिस्थितीकडे निराळ्या दृष्टिकोनातून बघून समाजावरची संकटे दूर करण्याचा किंवा समाज उद्धाराचा त्या व्यक्तीचा प्रयत्न असतो. त्या कार्यामुळेच ती व्यक्ती महान ठरते. छत्रपतींनी स्वराज्याच्या प्राप्तीला नेहमी “श्रींची इच्छा” असे म्हटले कारण कार्य श्रेष्ठ असते. व्यक्ती कार्यामुळे महान बनते.

कार्यापेक्षा जास्त कुठलीच व्यक्ती श्रेष्ठ नसते. महापुरुषांच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्यांचे अनुयायी मात्र त्यांनी आरंभिलेले कार्य पुढे नेण्याऐवजी त्या महापुरुषाची पूजा करण्यात धन्यता मानतात. इथूनच व्यक्ती पूजेला सुरुवात होते आणि महापुरुषांच्या तत्त्वांचा पराभवही सुरू होतो. त्यांच्या तत्त्वांना काळानुरूप बदलतं स्वरूप देण्याऐवजी, अथवा त्यातील निकड, गरज समाजाला समजावण्याऐवजी त्यांचे (त्या व्यक्तींचे) फक्त पुतळे उभारण्यात धन्यता मानतात आणि एक प्रकारे समाजाची दिशाभूल होऊन वैचारिक कुजवणूकही होते. पर्यायाने महापुरुषाचे कार्य, कार्यकारणता, उद्देश हे सर्व विरून जाते. केवळ गळ्यात पुष्पमाळा घालून कोनाड्यात बसवलेलं देवत्त्व त्यांना दिलं जातं. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजर्‍या केल्या जातात. कधी त्यांच्याविषयी केलेल्या विधानांचा त्यांच्या अनुयायांकडून निषेध वगैरे होतो.

थोडक्यात व्यक्तीपूजन होते. जेव्हा कार्यापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ होते तिथेच महापुरुषांचं अपयश मोजलं जातं आणि याला जबाबदार त्यांचे अनुयायी असतात. गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यांचे उदात्त विचार, पराकोटीची सामाजिक बांधिलकी, नैतिकतेचा आग्रह, यांच्याशी जेव्हा त्यांच्याच अनुयायांयांकडून प्रतारणा होते किंवा त्यांच्या वागण्यात विसंगती आढळते तेव्हा नाईलाजाने म्हणावे लागते की महापुरुषांचा पराजय त्यांचे अनुयायीच करत असतात.अधिक तीव्रतेने, अथवा कठोरपणे असंही म्हणता येईल की ज्यांना आपण या महापुरुषांचे अनुयायी म्हणतो ते प्रत्यक्षात फक्त राजकीय फायद्यासाठी त्यांचे “तोंडीलावणं” करतात तेव्हा या महापुरुषांचे झालेले आत्मिक पराभव जाणवतात.

याच विषयाच्या दुसऱ्या भागात “अनुयायी” हा घटक दूर ठेवला तर त्या व्यक्तीच्या आचारसंहितेतच कुठेतरी त्यांच्या पराजयाची बीजे सापडतात आणि यासाठी मला पुराणकालीन युगपुरुषांचाही वेध घ्यावासा वाटतो. प्रजाहितदक्ष, मर्यादापुरुष श्रीरामाचे चरित्र वाचतानाही त्यांनी केलेल्या “सीतेच्या त्यागाचं”समर्थन ओढूनताणूनच करावं लागतं.

पुराणातल्या महापुरुषांचा विचार माझ्या मनात जेव्हा येतो तेव्हा नकळत आणि अगदी अलगद माझं मन महाभारतातल्या महापुरुषांचा विचार करू लागतं. महाभारतातल्या कथा लहानपणापासून जशा सांगितल्या गेल्या तशा स्वीकारल्या गेल्या पण त्यानंतर जेव्हा जाणीवा काहीशा प्रगल्भ होत गेल्या तेव्हा महाभारतात गणल्या जाणाऱ्या थोर, धोरणी, कर्तव्यनिष्ठ शब्दकठोर, वचनबद्ध महापुरुषांविषयी संदेह निर्माण होऊ लागला. त्यात द्रोणाचार्य, अश्वत्थामा, युधिष्ठीर, कर्ण हे सुद्धा सारे महापुरुषच होते पण कुठे ना कुठे ते पराभूत होते, त्यांची कुठल्या ना कुठल्या प्रकारची महानताच त्यांना पराभूत करण्यासाठीचे कारण ठरली असे ठामपणे वाटतं.

त्यापैकी एका व्यक्तीचा मला या लेखात जाणीवपूर्वक परामर्श घ्यावासा वाटतो आणि ती व्यक्ती म्हणजे ज्यांनी आजन्म ब्रह्मचर्य आणि हस्तीनापूरच्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याची भीषण शप्पथ घेतली होती ते कुरू साम्राज्याचे पितामह, एक महान योद्धे आणि नीतीज्ञ. त्यांची जीवनकथा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांच्या प्रतिज्ञा, कुरु साम्राज्यात घडलेल्या प्रसंगाशी त्या त्या वेळच्या त्यांच्या भूमिका, त्या भूमिकांना दिलेलं वचनबद्धतेचं उदात्त कवच, कुरुक्षेत्रातल्या लढाईतलं त्यांचं सेनापतीपद आणि धोरण या अनेक बाबींचा एखाद्या विस्तृत कॅनव्हासवर मांडणी करून आढावा घेतला तर हा महापुरुष पराभूतच होता हे जाणवतं.

देवव्रत ते भीष्म ते भीष्माचार्य ते पितामह हा त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या भूमिकेवर नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह आकारतं. सोमवंशातील राजा शंतनु आणि गंगा यांचा पुत्र आणि महाभारतातील अत्यंत विख्यात असा एक महापुरुष म्हणजे भीष्म. मूळ नाव देवव्रत परंतु सत्यवती नामक धीवर कन्येवर त्यांच्या वडिलांचे मन बसले आणि तिच्याशी विवाह व्हावा म्हणून “माझ्याच मुलाला राज्य प्राप्त व्हावे” या तिच्या अटीला त्यांनी मान्यता दिली त्याचवेळी देवव्रतने ब्रह्मचर्याची शपथ घेतली आणि या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांना भीष्म असे उपनाव प्राप्त झाले आणि तेच प्रख्यात झाले. या प्रतिज्ञेपासूनच खरं म्हणजे भविष्यातल्या त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला. रणविद्या, राजनीती, अर्थशास्त्र, अध्यात्म, धर्मनीती इत्यादी क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अलौकिक होते.

“सर्वशास्त्रवेत्ता” म्हणूनच त्यांना मानले जायचे. कुरुवंशातील शंतनूपासून दुर्योधनापर्यंत अनेक पिढ्यांची त्यांनी काळजी घेतली. चित्रांगद आणि विचित्रवीर्य या सावत्र भावांचे ते संरक्षक बनले. आंबा, अंबिका, अंबालिका या राजकन्यांचे स्वयंवर त्यांनी जिंकले पण या मुली त्यांनी त्यांचा सावत्र भाऊ विचित्रवीर्यासाठी जिंकून आणल्या. स्वीकारलेल्या तत्त्वांचे काटेकोर पालन करणे हा त्यांचा स्वभाव म्हणून आमरण ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेशी ते अशा रीतीने चिकटून राहिले.

परशुरामांनी अंबेशी विवाह करण्याची त्यांना आज्ञा केली होती पण तीही त्यांनी पाळली नाही परिणामी अंबा सूडबुद्धीने ग्रासली गेली आणि कुरुक्षेत्री याच अंबेने शिखंडीच्या रूपात पुनर्जन्म घेऊन अर्जुनासोबत लढताना भीष्मास हरवले. शिखंडी रुपातल्या अंबेकडून म्हणजेच एका स्त्री कडून आलेल्या बाणांचा भीष्मांनी प्रतिकार केला नाही म्हणूनच ते रणांगणात अखेर कोसळले.

दु:शासनाने भर दरबारात केलेली द्रौपदीची विटंबना हा महापुरुष थांबवू शकला नाही हा केवढा तरी मोठा कलंक या महान विद्वान व्यक्तीवर कायमचा लागलेला आहे.
द्रौपदीने त्यांना प्रश्न केला होता,” जुगारात हरलेल्या युधिष्ठीरास मला पणाला लावायचा काय अधिकार होता? वस्त्रहरणाच्या वेळी पितामह तुम्ही मौन धारण करून न्यायाच्या दरबारात माझा अपमान का केलात?”
द्रौपदीचा हा प्रश्न म्हणजे भीष्माच्या आचारसंहितेवर आणि न्यायाच्या उल्लंघनावर केलेला थेट आरोप होता. त्यांचा कायदेशीरपणा आणि नीतिमत्तेवरच तिने प्रश्नचिन्ह उभे केले होते आणि इथेच या महापुरुषाचा दारुण पराभव अधोरेखित होतो.

“कुरुवंशाचे खाल्लेले मीठ विरोधास रोकतं” हे त्यांनी केलेलं त्यांच्या मौनाचं समर्थन अत्यंत पांगळं नव्हतं का? कौरवांचे दोष दिसत असतानाही युद्धात त्यांच्याच बाजूने लढणे, ज्या कुलाचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा केली ते कुल नष्ट होण्याची चिन्हे दिसत असतानाही केवळ प्रतिज्ञेला चिकटून राहण्यासाठी असत्य, अधर्माविषयी मौन बाळगणं हे या महापुरुषाच्या नैतिक पराभवाचं मूळ कारण आहे.
युद्धानंतर इच्छामरणी,मृत्युला उत्तरायण सुरू होईपर्यंत थांबवणारे, शरपंजरी पहुडलेले पितामह भीष्म कृष्णास प्रश्न विचारतात.

“एका क्रूर वास्तवास मला का सामोरे जावे लागत आहे? इतिहास माझ्याकडे कोणत्या दृष्टीने बघेल?” त्यावेळी कृष्ण सांगतात,” कुरुक्षेत्रातील रक्तपात हा धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी गरजेचा होता. जरी त्यात पितृतुल्य व्यक्तींचा वध होणे वेदनादायी होते.” श्रीकृष्ण पुढे सांगतात,” जेव्हा क्रूरता आणि अधर्म मर्यादा ओलांडतात तेव्हा प्रतिज्ञा, वचनबद्धता, शब्दकठोरता हा आत्मघाती मार्ग ठरतो. पितामह! तुमच्या वैचारिकतेत नैतिकता असली तरी वास्तविक लवचिकता नव्हती. असत्य आणि अधर्म दिसत असतानाही तुम्ही तुमच्या विचारांची माघार पत्करली असती तर आज हा रक्तपात नव्हे हे युद्धच वाचले असते. पितामह! म्हणून नेमके इथेच तुम्ही खऱ्या अर्थाने पराभूत झालात.”

एका महापुरुषाचा पराभव कलियुगात किंवा युद्धाच्या काळात हेच सूचित करेल की भीष्माचार्यांसारख्या जुन्या नियमांपेक्षा अन्यायाविरुद्ध लढण्याचे कृष्णा सारखे धोरणच उपयुक्त आहे. कृष्ण -भीष्म यांच्या संवादातून हेच स्पष्ट होते की न्यायाच्या रक्षणासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. स्वीकृत धोरणांना छेद द्यावे लागतात. जे भीष्मासारख्या ज्ञानी पुरुषाला का समजू शकले नाही ?

महापुरुषांचा पराभव याविषयाचा विचार करतांना भीष्माचार्यांचे उदाहरण प्रातिनिधीक स्वरूपातले आहे.

वर्तमानात होणाऱ्या निवडणुकांचा, युद्धांचा, युद्धात कोसळणाऱ्या अथवा हत्या होणाऱ्या त्या त्या देशांतील नेत्यांचा, त्यांच्या पराभवाचा विचार भविष्यात जेव्हा कधी होईल तेव्हा त्यांच्याही पराभवाची कारणे अशीच त्यांचे अनुयायी,राजकीय आणि वैयक्तिक स्तरावर तपासली जातील हे नक्कीच.

राधिका भांडारकर

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा