*हजारो आंबा,काजू शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला भव्य आक्रोश मोर्चा*
*१० दिवसांत सरकारने नुकसान भरपाई दिली नाही तर २३ रोजी चक्काजाम आंदोलन- राजू शेट्टी*
*शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे- वैभव नाईक*
ओरोस
नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सरसकट कर्जमाफी व्हावी,आणि आंबा व काजू पिकांसाठी जास्तीत जास्त हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी आंबा, काजू बागायतदार शेतकरी व व्यापारी महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने आज ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार,शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केले.या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठींबा देत माजी आमदार वैभव नाईक मोर्चात सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने शेतकरी, व्यापारी, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय! शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो! शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो! जय जवान जय किसान!अशा घोषणा देण्यात आल्या.
मोर्चाला संबोधित करताना शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले, १६ लाख कोटी रुपयांची उद्योगपतींची कर्जे सरकारकडून माफ केली जातात आणि दोन अडीच हजार कोटी रुपये आपल्या आंबा, काजू उत्पादकाला सरकार देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. या आंबा उत्पादकांनी जगाच्या बाजारपेठेत राज्याची आणि देशाची ताठ मान केली आहे. सिंधुदुर्गच्या आंब्याची जगात ख्याती आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आंब्याला हेक्टरी ५ लाख रुपये, आणि काजूला हेक्टरी ३ लाख रु. नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.तसेच विम्याची मुदत वाढावी आणि कर्जमाफी झाली पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत. पुढील १० दिवसात सरकारने या मागण्या पूर्ण कराव्यात.या १० दिवसांत अडचणीत सापडलेल्या आंबा काजू उत्पादकाला सरकारने मदत केली नाहीतर २३ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता नांदगाव येथे मुंबई-गोवा हायवेवर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे.सर्वांनी त्याठिकाणी उपस्थित रहावे. एक मुंगी इकडची तिकडे जाता नये अशा पद्धतीचे हे आंदोलन झाले पाहिजे असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.असे संकट याआधी कधीही सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आले नव्हते. या संकटामुळे पिकांसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम भरण्यासाठी देखील शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. सातत्याने सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी होत आहे. परंतु दुर्दैवाने कालच्या बजेट मध्ये देखील सरकारकडून कोणतीही नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली नाही. सरकारने यावर ठोस भूमिका घेतली पाहिजे.मी मुख्यमंत्र्यांना भेटून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आपल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे कधीही काही मागितले नाही. नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी हा आक्रोश केला आहे. आणि तरीही सरकारकडून मदत झाली नाही तर शेतकरी यापुढे तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आंदोलन करतील असे वैभव नाईक यांनी सांगितले.
