९६१ किलो वजनाच्या मुळांसह २६ पोती जप्त; न्यायालयाकडून ५ मार्चपर्यंत फॉरेस्ट कस्टडी
कुडाळ :
सावंतवाडी वनविभागाच्या अखत्यारितील कुडाळ परिमंडळांतर्गत नेरूर (ता. कुडाळ पश्चिम) नियतक्षेत्रातील चाफेकली वनपरिक्षेत्रातील शासकीय राखीव जंगलात दुर्मिळ ‘सप्तरंगी’ या औषधी वनस्पतीची अवैध तोड करून तिची मुळे काढून वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला वनविभागाने जेरबंद केले आहे. आरोपीकडून ९६१ किलो वजनाची सप्तरंगी वनस्पतीची मुळे व फांद्या भरलेली २६ पोती जप्त करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत ₹५६,६९९ इतकी आहे.
नेरूर (पश्चिम) येथील कक्ष क्रमांक ९०अ मध्ये एकूण ९४७.२७ हेक्टर शासकीय राखीव वनक्षेत्र आहे. दि. ३ मार्च २०२६ रोजी वनपाल चाफेली, वनरक्षक नेरूर (पश्चिम), वनरक्षक चाफेली व वनरक्षक पुळास यांनी स्टाफसह रात्री गस्त घालत असताना दि. ४ मार्च रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता कोरड्या नदीपात्रातून डांबरी रस्त्याकडे शिरओझ्याने सप्तरंगी वनस्पतीची वाहतूक करताना विकृल लक्ष्मण लागड याला अडविण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने वनपाल चाफेली यांच्या समक्ष गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दोन पंचांसमक्ष पंचनामा करून आरोपीच्या ताब्यातील सप्तरंगी वनस्पतीची २६ पोती जप्त करण्यात आली. याबाबत रा. गु. क्र. सी-०१/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी आरोपीला रेंज कार्यालय, कुडाळ येथे आणून जबाब नोंदविण्यात आला. आरोपीने साथीदारांसह संगनमत करून शासकीय राखीव वनात अनधिकृत प्रवेश करून सप्तरंगी झाडांची तोड करून त्यांची मुळे विक्रीसाठी वाहतूक केल्याची कबुली दिली.
पंचांसमक्ष अटक पंचनामा करून आरोपीला अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. ५ मार्च २०२६ पर्यंत फॉरेस्ट कस्टडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास वनक्षेत्रपाल कुडाळ श्री. एस. एन. कुंभार हे उपवनसंरक्षक श्री. मिलिंद दत्त शर्मा व सहाय्यक वनसंरक्षक श्री. एस. के. लाड (खा. कु. तो. व वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. तपासात वनपाल संतोष गोरे, वनरक्षक निखिल खोत, शिवाजी पाटील, किरण गोसावी व वनपाल सावळा कांबळे यांचे सहकार्य लाभले आहे.
सदर प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर असून या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती वनक्षेत्रपाल श्री. कुंभार यांनी दिली.
