महिला दिनानिमित्त सावंतवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
महिला व बालकल्याण समिती सभापती दिपाली भालेकर यांची माहिती; ८ मार्च रोजी बॅ. नाथ पै सभागृहात कार्यक्रम
सावंतवाडी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषदच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता बॅ. नाथ पै सभागृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली भालेकर यांनी नगरपरिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपसभापती सौ. सुनिता पेडणेकर व दुलारी रांगणेकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी स्वसंरक्षण विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी पाककला स्पर्धा आणि फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या पाककला स्पर्धेचा विषय ‘बेसनपासून तयार केलेले तिखट व गोड पदार्थ’ असा निश्चित करण्यात आला आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी ६ मार्चपर्यंत सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयातील श्रीम. परवीन शेख (८५५०९५०७२१) यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
महिला दिनाच्या या कार्यक्रमांना सावंतवाडी शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सभापती दिपाली भालेकर व उपसभापती सौ. सुनिता पेडणेकर यांनी केले आहे.
