सुखदुःखांच्या पारंब्यांचा पसारा पेलत उभा ठाकलेला एक वटवृक्ष मधु मंगेश कर्णिक! : विश्वास पाटील
1990 च्या रत्नागिरीच्या साहित्य संमेलनाच्या स्मृती आणि गजाली मनामध्ये ताज्या असतानाच बघता बघता मधू मंगेश कर्णिक 96 वर्षांचे झाले. चार वर्षांत त्यांची शंभरी येईलच. पण लवकरच ते आपल्या ग्रंथलेखनाचे सुद्धा शतक गाठणार आहेत. कारण आजवर त्यांची 90 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
पळस पानावरचे फणसाचे गरे आणि दुःखाचे द्रोण, दोन्ही कसे धीटपणे पचवावेत याचा वस्तूपाठ म्हणजे मधु मंगेश कर्णिक यांचे जीवन होय.
अलीकडेच रत्नागिरी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या तमाम शाखा आणि रत्नागिरीतील जनतेने त्यांचा एक भव्य सत्कार आयोजित केला होता. त्याला प्रमुख पाहुणा म्हणून जायचा मला योग आला. शंभराला चार वर्षे कमी असतानाही भाईंच्या अंगातला तो तरुण कोवळ्या पोरासारखा अखंड उत्साह, ते हास्य, ती लगबग आणि त्यापेक्षाही जबरदस्त स्मरणशक्तीचे त्यांनी काठोकाठ जपून ठेवलेले रांजण — या वयातल्या त्यांच्या या मिळकतीला कोणीही मानाचा मुजरा करावा अशाच साऱ्या त्या गोष्टी.
मधुभाईंच्या जीवनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आयुष्याच्या प्रवासात त्यांच्या वाट्याला आलेल्या काही लोकोत्तर व्यक्ती. मराठी मनाला आपल्या शब्दकाव्यांनी वेड लावणारे चिं. त्र्यं. खानोलकर हे त्यांचे वर्गबंधू. दोघांनी मॅट्रिकची परीक्षा सोबत दिली. आरती प्रभू नावाचा हा थोर कवी घडताना आणि बघता बघता पिंपळवृक्षासारखा विस्तारताना, पळसासारखा फुलताना त्यांनी जवळून पाहिला होता. त्या आरती प्रभूंच्या अंत्यसंस्कारासाठी साहित्य खरेदी करण्याची नौबतही काळाने त्यांच्यावर आणली होती. कोकणी माणसांच्या जीवनातून अचानक उल्कापातासारखा निघून जाणारा भाग्यतारा म्हणजे बॅरिस्टर नाथ पै. नाथ पै हे सुद्धा मधुभाईंचे जवळचे मित्र. आरती प्रभू आणि नाथ किंवा साळवी मास्तर अशी अप्रतिम व्यक्तीचित्रे मधुभाईंच्या शब्दातून वाचणे ही तर पर्वणीच. आरती प्रभूवर ढिगाने पुस्तके आली; पण मधुभाईंनी लिहिलेले त्यांचे व्यक्तिचित्र केवळ अप्रतिम आहे.
कर्णिक यांच्या कथा वाचताना त्यांनी स्त्रीजीवनाचा जो धांडोळा घेतला आहे, त्याचा आवाका आणि सखोलता पाहता नव्या अभ्यासकांनी त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबाबत नव्याने अभ्यास करायची गरज आहे असे वाटते. “माहीमची खाडी”, “भाकरी आणि फुल” ह्या तर मधुभाईंच्या अतिशय उत्कट अशा कादंबऱ्या.
आपल्या आयुष्याच्या शंभरीचे महावस्त्र विणताना या थोर लेखकाच्या जीवनातील काही धागे मध्येच असे तुटून गेले आहेत की दुसरा एखादा जागेवरून उठला नसता. त्यांच्या संसारावर आणि संसारापेक्षा शब्दसंसारावर जिवापाड प्रेम करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवतीचे मध्येच निघून जाणे हा त्यांच्यासाठी मोठा आघात होता. पण त्याहीपेक्षा आपल्या कर्तबगार पुत्राचा रेल्वे अपघातात झालेला मृत्यू आपल्या वार्धक्याच्या फांदीवरून पाहणे ही एखाद्या कवी किंवा लेखकासाठी दुःखाची आणि क्लेशाची किती कातिल परी असते हे ज्याचे त्याला माहीत.
पण तरीही भाईंनी आपल्या पुत्रवियोगाच्या दुःखाचे द्रोण निमूटपणे पचवले. जनांना जीवनानंद देणाऱ्या लेखक-कवीने स्वतःच्या चेहऱ्यावर पांघरलेला उत्साहाचा मुखवटा जपत असताना त्याच्या आड घामाचा नव्हे तर अश्रूंचा थर कसा साचतो, त्याची अनुभूती त्याच कलावंत जीवाला माहीत.
या तपस्वी साहित्यिकाच्या योग्य सन्मानासाठी भाषा मंत्री उदय सामंत, प्रदीप ढवळ, नमिता कीर आणि एकूणच रत्नागिरीकरांनी व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, ती इतरांनी वाखाणण्याजोगी आहे. अनुकरणीय आहे.
सुखदुःखाच्या पारंब्यांचा साज सावरत शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या मधु मंगेश कर्णिक या नावाच्या ह्या वटवृक्षास माझा मानाचा मुजरा.
विश्वास पाटील.
