सावंतवाडी :
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग मासिक चौसष्ठावा कार्यक्रम नुकताच शिरोडा येथील र.ग.खटखटे ग्रंथालयात संपन्न झाला.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त संपन्न झालेल्या ‘विशाखाचा वर्षाव’ या कार्यक्रमात ‘सुप्रसिद्ध साहित्यिक कै. वि.वा.शिरवाडकर यांच्या साहित्याचा वेध घेण्यात आला.
सुरुवातीला ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यानी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला; तर साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक केले.
मुख्य कार्यक्रमात प्रथम स्नेहा नारींगणेकर यानी कुसुमाग्रजांचा परिचय करून दिला व त्यांची ‘दूरस्थ कुणी दे तुझ्या करी’ ही कविता सादर केली. त्यानंतर सोमा गावडे यांनी शिरवाडकरांच्या नाटकांचा आढावा घेतला व ‘राजमुकुट’ या नाटकाचा परिचय करून दिला. सरोज रेडकर या ‘नटसम्राट’ या नाटकाविषयी बोलल्या व त्यानी ‘कुणी घर देता का घर’ हे स्वगत सादर केले. राजेश वैज यानी ‘वीज म्हणाली धरतीला” या नाटकातील ‘चार होत्या पक्षिणी त्या’ या नाट्यपदाचा परिचय करून दिला. भालचंद्र दिक्षित यानी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या कवितेचे रसग्रहण केले. रवींद्र पणशीकर व राजेंद्र पणशीकर यानी स्वरचित कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कमलेश अणावकर यांनी शिरवाडकर यांच्या ‘रद्दी ‘ या कवितेवर लिहिलेली कथा. या कथेचे अभिवाचन स्वतः कमलेश, ॲड. श्रद्धा राऊळ आणि कु. मुक्ताई पणशीकर यांनी सुरेख केले. त्याला उपस्थितांची दाद मिळाली.
सुमारे १२ काव्यसंग्रह, १८नाटके, ३ एकांकिका, ५ कथासंग्रह, ३ कादंबऱ्या, ५ ललितलेख संग्रह व बालसाहित्य असे विपूल लेखन केलेल्या ज्ञानपीठकार वि.वा.शिरवाडकर यांच्या समग्र साहित्याचा आढावा विनय सौदागर यांनी घेतला आणि ‘प्रेम कुणावरही करावे’ ही कविता सादर केली.
नेटका, सुरेख व रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाची सांगता शेखर पणशीकर यानी एका सुरेल नाट्यपदाने केली. आभार सचिन गावडे यानी मानले.
