नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या बैठका जाहीर; विविध प्रवर्गांसाठी पदे आरक्षित
सिंधुदुर्गनगरी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ ची मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पूर्ण झाली. निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती, उपसभापती पदांच्या निवडीसाठी पहिल्या बैठकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक २० मार्चपूर्वी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक १६ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून कार्यकाल अडीच वर्षांचा राहणार आहे. संबंधित सदस्यांना कार्यालय तसेच तहसीलदारांमार्फत नोटीस देण्यात आली असून सर्वांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग पंचायत समित्यांमध्ये ९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पहिली बैठक होणार आहे.
सभापती पदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे – वैभववाडी (सर्वसाधारण), कणकवली (नागरिकांचा मागास प्रवर्ग- महिला), देवगड (सर्वसाधारण), मालवण (सर्वसाधारण- महिला), कुडाळ (सर्वसाधारण), वेंगुर्ला (नागरिकांचा मागास प्रवर्ग- सर्वसाधारण), सावंतवाडी (अनुसूचित जाती- महिला) व दोडामार्ग (सर्वसाधारण- महिला).
सभापती पदाचा कार्यकाल अडीच वर्षांचा राहणार असून आरक्षित प्रवर्गातील व्यक्ती कोणत्याही गणातून निवडून आलेली असली तरी ती निवडणूक लढविण्यास पात्र राहील. महिला आरक्षणासाठीही हेच निकष लागू राहतील. सभापती निवडणुकीनंतर त्याच बैठकीत उपसभापती पदाची निवडणूक होणार आहे.
सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांनी संबंधित पंचायत समिती सभागृहात ९ मार्च रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
