You are currently viewing दुर्गम भागासाठी फिरता दवाखाना आता सायंकाळीही

दुर्गम भागासाठी फिरता दवाखाना आता सायंकाळीही

सिंधुमित्र प्रतिष्ठान व योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशनचा उपक्रम; दीड वर्षांत १०,५०० रुग्णांना मोफत सेवा

सावंतवाडी / ओटवणे  :

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी व योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरत्या वैद्यकीय पथका’ची सेवा आता सायंकाळच्या सत्रातही उपलब्ध होणार आहे. सोमवार, २ मार्चपासून न्हावेली, सोनुर्ली, वेत्ये, कास, सातोसे, निगुडे, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल व नेतर्डे या दहा दुर्गम गावांमध्ये सायंकाळी मोफत तपासणी व औषधोपचार केले जाणार आहेत.

सकाळच्या सत्रात गेल्या दीड वर्षांपासून कार्यरत असलेल्या या फिरत्या दवाखान्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता सायंकाळीही सेवा उपलब्ध होत असल्याने शेतकरी, मजूर व दिवसभर काम करणाऱ्या नागरिकांना उपचार घेणे अधिक सोयीचे होणार आहे.

दीड वर्षांत १०,५०० रुग्णांची निःशुल्क तपासणी

या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत सुमारे १०,५०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून औषधेही विनामूल्य देण्यात आली आहेत. आठवड्यातून दोन वेळा प्रत्येक गावात भेट देणारा हा दवाखाना दर रविवारी व महत्त्वाच्या सणांव्यतिरिक्त नियमित सुरू असतो.

ग्रामीण भागात आरोग्य सेवा महागडी व दूरवर उपलब्ध असल्याने अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहत होते. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ व खर्च टाळण्यासाठी हा फिरता दवाखाना गावातच सेवा देत असल्याने गरीब व गरजू रुग्णांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

‘डॉ. डी. बी. खानोलकर रुग्ण सेवा केंद्र’चा उपक्रम

प्रतिष्ठानतर्फे ‘वापरा व परत करा’ या तत्त्वावर ‘डॉ. डी. बी. खानोलकर रुग्ण सेवा केंद्र’ सुरू करण्यात आले असून २०१८ पासून शेकडो रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे. केंद्रातील ‘शितशव पेटी’सह विविध आरोग्यसुविधा गरजूंना उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

सेवेचा महत्त्वाचा दुवा : डॉ. प्रवीणकुमार ठाकरे

सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे गेली १४ वर्षे आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवत आहेत. कोरोना काळातही जीव धोक्यात घालून त्यांनी आरोग्य सेवा व जनजागृतीचे कार्य केले. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कृती समिती स्थापन करून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

मुंबईस्थित संस्थेच्या सहकार्याने सुरू केलेल्या या फिरत्या पथकाचा विस्तार सायंकाळच्या सत्रात करण्यामागे “गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच खरी पावती” असल्याचे डॉ. ठाकरे यांनी सांगितले.

सायंकाळच्या सत्राचे वेळापत्रक

सोमवार व गुरुवार :

३.०० ते ३.४५ – न्हावेली पार्सेकरवाडी शाळा क्र. ४

४.०० ते ४.४५ – न्हावेली ग्रामपंचायत

५.१५ ते ६.१५ – सोनुर्ली माऊली मंदिर

६.३० ते ७.०० – वेत्ये कलेश्वर मंदिर

मंगळवार व शुक्रवार :

३.०० ते ३.३० – कास माऊली मंदिर

३.४५ ते ४.१५ – कास दाभळवाडी

५.०० ते ५.४५ – सातोसे माऊली मंदिर

६.१५ ते ७.०० – निगुडे ग्रामपंचायत

बुधवार व शनिवार :

३.०० ते ४.०० – डिंगणे माऊली मंदिर

४.१५ ते ४.४५ – गाळेल शाळा क्र. १

५.१५ ते ६.०० – डोंगरपाल शाळा क्र. १

६.१५ ते ७.०० – नेतर्डे ग्रामपंचायत

रुग्णांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे व प्रथमच तपासणीसाठी येताना आधारकार्ड सोबत आणावे, असे आवाहन संस्थेचे विश्वस्त सीए विवेक दोषी व डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी केले आहे.

दुर्गम भागातील आरोग्य सेवेचा आधारस्तंभ ठरलेला हा फिरता दवाखाना भविष्यात आणखी गावांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा