You are currently viewing सोडा या गजला…
Oplus_16908288

सोडा या गजला…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

   *सोडा या गजला…*

 

नकोच मोह नि नको अहंता उपयोग काय त्याचा

जाणे आहे एक दिवस हो आठव हो याचा…

 

कृष्ण सांगतो कर्म करा हो अर्पा ते मजला

माझे माझे म्हणू नका हो सोडा या गजला..

 

माझे माझे काही नसे हो सारे तर त्याचे

एकही वस्तू नाही आपली घर ही भाड्याचे..

 

माती त्याची पाणी त्याचे उगवणं ही त्याची

फुले फळे ही असती त्याची झुळूकही वाऱ्याची..

 

देह ही त्याचा श्वास तयाचा हृदयी जोवर तो

सोडून जाता दाता त्यातील कलेवर होतो..

 

झाडे हलती पाने हलती किमया ही त्याची

किलबिल बोली झाडावरती किती ती सौख्याची..

 

कण मातीचा नसे आपला वृथा गर्व काय

म्हणे अमुक मी म्हणे तमुक मी बोलत तो जाय..

 

नश्वर आहे सारे येथे सत्य एक नाम

स्मरा स्मरा हो मजला सांगे तोच एक दाम..

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा