अखेर यश मिळाले!
15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाला एक वर्षाची स्थगिती; सविस्तर अभ्यासानंतर पुढील निर्णय
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर आज शिक्षणमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस रत्नागिरी–सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, उदय सामंत तसेच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही शाळा बंद पडू नये, यासाठी ठाम भूमिका मांडली. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांनी शासनाकडे आग्रह धरला.
त्याअनुषंगाने 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाला एक वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करून पुढील योग्य निर्णय घेतला जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
हा निर्णय तात्पुरता असला तरी सध्याच्या परिस्थितीत तो मोठा दिलासा देणारा ठरला आहे. त्यामुळे संभाव्य संकट टळले असून, शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच, सिंधुदुर्ग यांनी काढलेल्या प्रचंड मोर्च्याचे हे सामूहिक यश मानले जात आहे.
या निर्णयाबद्दल सर्व मोर्चेकऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पालकमंत्री नितेश राणे, उदय सामंत आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मंचाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
— संजय वेतुरेकर
शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच, सिंधुदुर्ग
🌹🙏
