एआय तंत्रज्ञानाचा वापर समाजहितासाठी करा- डॉ. भालचंद्र मुणगेकर ;
एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजचा पदवीदान सोहळा उत्साहात…
मालवण
तंत्रज्ञान विश्वात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव वेगाने वाढत आहे. ज्या माहितीसाठी पूर्वी आठ दिवस लागायचे, ती आता अवघ्या १५ मिनिटांत उपलब्ध होत आहे. हे तंत्रज्ञान जितके फायद्याचे आहे, तितकेच ते रोजगारासाठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे विज्ञानातील या ज्ञानाचा वापर समाजाच्या हितासाठी करायचा की तोट्यासाठी, याचा गांभीर्याने विचार राज्यकर्ते आणि वैज्ञानिकांनी करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
सुकळवाड (ता. मालवण) येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम (
इंजिनिअरिंग कॉलेजचा पदवीदान सोहळा रविवारी पार पडला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती प्रमोद तरारे, ॲड. महेश सरनोबत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मुणगेकर यांनी स्वतःच्या जीवनातील संघर्षाची आठवण करून दिली. ते म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत मी कुलगुरू आणि राज्यसभा खासदारापर्यंतचा प्रवास केला. इंटरच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मी ज्या राजाभाई टॉवरखाली रडलो होतो, त्याच विद्यापीठाचा मी पुढे कुलगुरू झालो. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता जिद्दीने पुढे जावे. पदवी मिळाल्यावर नम्रता बाळगा आणि समाजातील उपेक्षित घटकांविषयी मनात सहानुभूती ठेवा. ग्रामीण भागात दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल यांचेही कौतुक केले.
संतोष पाल म्हणाले की, आयुष्यात आव्हाने येतच असतात, एआय हे देखील एक आव्हान आहे. मात्र, मनुष्य भावनेच्या आधारे काम करत असल्याने तो एआयपेक्षा नेहमीच श्रेष्ठ राहील. विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर समाधान न मानता जबाबदारी घ्यायला शिकावे आणि स्टार्टअपसारख्या क्षेत्रात पाऊल टाकावे. कॉलेजच्या यशात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहकारी संचालकांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माजी न्यायमूर्ती प्रमोद तरारे म्हणाले, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातून मी न्यायाधीश बनू शकलो. पालकांनी तुम्हाला तळ्यापर्यंत नेले आहे, आता पोहून पुढे जाण्याची जबाबदारी तुमची आहे. अशोक सावंत म्हणाले, गेल्या १५ वर्षांत या कॉलेजमधून ५ हजारांहून अधिक विद्यार्थी घडले आहेत, त्यातील अनेकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत, त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल म्हणाले, एमआयटीएममधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळतात, हा आमचा इतिहास आहे.
या सोहळ्याला प्रा. गौतम मुणगेकर, राकेश सावंत, उपप्राचार्य प्रा. विशाल कुशे, प्रा. पूनम कदम, प्रा. रोशनी वरक, प्रा. जानकी पावसकर, प्रा. संजय कुशे, प्रा. सिद्धार्थ जाधव, प्रा. सिद्धेश शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
