You are currently viewing महाशिवरात्र – अंतर्मुखतेचा उत्सव

महाशिवरात्र – अंतर्मुखतेचा उत्सव

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*महाशिवरात्र – अंतर्मुखतेचा उत्सव*

 

 

काळोख्या रात्री दीप चेतनेचा तेवत

ओंकार निनादात विश्व शांत होते,

वैराग्याची राख अंगी लेपून शिव उभे

भक्तीच्या सागरात मन निर्मळ होते..

 

जटेत गंगेचा प्रवाह शीतल वाहत

अहंकार वितळून अंतर झुकते,

काळ थबकतो डमरूच्या नादात

श्वास-निश्वासांत जीव शिवात थांबते..

 

त्रिनेत्र उघडताच अज्ञान जळत

सत्याचा प्रकाश मनात उजळते,

भस्मातून जीवन नवे उमलत

साधनेतून जीवन अर्थाने नटते..

 

नीलकंठाच्या त्यागात विश्व वाचत

करुणेचा झरा अंतरी वाहतो,

वेदनांचे विष धैर्याने पचवत

अंतर्मुखतेचा उत्सव साजरा करतो..

 

रात्र जागी ठेवते साधकाला

मौनात उत्तर सापडत जाते,

प्रश्न विरघळती ध्यानधारेत

अंतर्मनाशी शिव-शिव नाते..

 

महाशिवरात्री जागविते आत्मभान,

जन्म-मरणाचा पडदा सोडवते,

मीपण गळोनी उरे फक्त शिवत्व

अनंतात विलीन अस्तित्व फुटते..

 

 

सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा