अमरावती परिसरातील वलगाव येथील प्रतिष्ठित संस्था म्हणून नावलौकिकास आलेल्या श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शनिवार दि. 14 फेब्रुवारी रोजी ताणतणाव निर्मूलन व परीक्षा पे चर्चा या विशेष कार्यशाळेचे आयोजन श्री. प्रकाश सिकची यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. पुणे येथील सुप्रसिद्ध वक्ते व शिवजयंती कार्यक्रमासाठी पंधरा दिवसांसाठी अमरावतीला आलेले डॉ. प्रवीणकुमार शेंडे यांना कार्यशाळेसाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ व मिशन आय ए ए चे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे हे होते.
वलगाव येथील सिकची वाचनालयात पार पडलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री सचिन माळकर यांनी केले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्मृतिचिन्ह, शाल, वृक्ष व बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेचे आयोजन श्री प्रकाश प्रेमकिशोर सिकची यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. या कार्यशाळेला श्री प्रेमकिशोर सिकची अभ्यासिका व ग्रंथालयाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच श्री रामचंद्र निर्मळ प्राथमिक शाळा व श्री प्रेमकिशोर सिकची शाळेमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी व अध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पुणे येथील सुप्रसिद्ध वक्ते डॉ. प्रवीणकुमार शेंडे यांनी ताणतणाव निर्मूलन परीक्षा पे चर्चा व स्मरणशक्ती तंत्रज्ञान याचे प्रात्यक्षिकासह उद्बोधन केले. तसेच त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली. या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात बहुतांश विद्यार्थी सहभागी झाले होते. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात परीक्षेच्या संदर्भात ताण-तणाव संतुलन व बुद्धिमत्ता विकास या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. पुणे येथील वक्ते आले व त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ही गोष्ट वलगावकरांच्या दीर्घकाळ लक्षात राहील. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन श्री. गजाननराव कडू यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिकची हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनिषा निर्मळ व त्यांचे शिक्षक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर पाहुण्यांनी सिकची रिसॉर्टला भेट दिली.
या कार्यशाळेला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री सचिन माळकर यांनी वलगाव येथील भव्य सिकची रिसॉर्टमध्ये दर्यापूर अचलपूर चांदूरबाजार तसेच अमरावती तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अध्यापकांसाठी व पालकांसाठी एक भव्य कार्यशाळेचे आयोजन करणार असल्याचे याप्रसंगी जाहीर करून वलगाव ते वेलगाव या श्री प्रेमकिशोरजी सिकची यांच्या संकल्पास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्री सचिन माळकर
संचालक प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट , वलगाव जिल्हा अमरावती यांनी कळविले आहे.
