You are currently viewing मालवणमध्ये विकासकामांवर गुणवत्ता बंधनकारक

मालवणमध्ये विकासकामांवर गुणवत्ता बंधनकारक

मालवणमध्ये विकासकामांवर गुणवत्ता बंधनकारक

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

मालवण

शहरात सुरू असलेली सर्व विकासकामे नियमानुसार आणि उच्च दर्जाची झाली पाहिजेत. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना पालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी प्रशासनाला दिल्या.
आज त्यांनी मेढा येथील मौनीनाथ मंदिर मार्गावरील सुरू असलेल्या गटार बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. शहरातील विविध प्रभागांमध्ये सध्या विकासकामे वेगाने सुरू असून, त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी सभापती बापर्डेकर यांनी संबंधित कामांची पाहणी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मेढा परिसरातील गटार बांधकामाच्या ठिकाणी भेट देत त्यांनी कामाच्या तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती घेतली.
शहरातील सर्व कामे दर्जेदार होणे ही बांधकाम विभागाची प्रमुख जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांनी प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवून ती विहित नियमांनुसार पूर्ण करून घ्यावीत, असे त्यांनी बजावले.
या पाहणीवेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेविका मेघा सावंत तसेच बांधकाम विभागाचे अभियंता राजा केरीपाळे उपस्थित होते. अन्य नगरसेवकांनीही आपल्या प्रभागातील सुरू असलेल्या विकासकामांबाबत चर्चा केली.
विकासकामे करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, तसेच कामाचा दर्जा कायम राखला जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा