२८ फेब्रुवारी व १ मार्चला महालक्ष्मी हॉलमध्ये होणार आयोजन
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तिकार संघातर्फे २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये सहाव्या जिल्हास्तरीय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मूर्तिकारांनी २० फेब्रुवारीपूर्वी नोंदणी करणे अनिवार्य आहे. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत मूर्ती अडीच ते साडेतीन फूट उंचीची, शाडूची व नैसर्गिक रंगांमध्ये साकारलेली असावी, अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांकास ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल, तर १ मार्च रोजी दुपारी ४ वाजता बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक मूर्तिकारांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मूर्तिकार संघाचे अध्यक्ष नारायण सावंत व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
