You are currently viewing बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा किटचे वितरण लवकरच

बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा किटचे वितरण लवकरच

बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा किटचे वितरण लवकरच –

शिवसेना कामगार नेते तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती

कुडाळ

इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि दैनंदिन गरजा लक्षात घेऊन जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात साहित्य वितरणाची तयारी सुरू झाली आहे.
यापूर्वी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच तसेच सुरक्षा संचाचा लाभ देण्यात आला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून पात्र कामगारांसाठी ‘अत्यावश्यक संच’ (Essential Kit) देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या योजनेचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हजारो नोंदणीकृत कामगारांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
या अत्यावश्यक संचामध्ये पत्र्याची पेटी, प्लास्टिक चटई, २५ व २२ किलो क्षमतेच्या धान्य साठवण कोठ्या, बेडशीट, चादर, ब्लॅंकेट, साखर व चहा पावडरसाठी एसएस २०२ दर्जाचे डबे तसेच १८ लिटर क्षमतेचा दोन कँडलसह वॉटर प्युरिफायर यांचा समावेश आहे.
दरम्यान, नव्याने नोंदणी झालेल्या कामगारांसाठी ‘सुरक्षा संच’ (Safety Kit) वितरणालाही मान्यता देण्यात आली असून संबंधित साहित्य जिल्ह्यात दाखल झाले आहे.
अत्यावश्यक संच व सुरक्षा किट योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कामगारांनी ऑनलाईन पूर्वनोंदणी करावी आणि यासाठी संघटनेच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना कामगार नेते तथा स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. कामगार हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा