*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*घरातून देवघर वजा केले तर…*
देव्हारा म्हणजे घरातलं एक छोटसं मंदिर असतं. घरात देव्हारा असणं ही धार्मिक, सांस्कृतिक परंपरा आहे. मान्य आहे घराच्या रचना बदलत गेल्या, पारंपरिक घरांना आधुनिकतेने काहीसा छेद दिला गेला, कुटुंबे संयुक्त झाली, तसेच जागेच्या अभावी आर्थिक कारणांमुळेसुद्धा घराची लांबी -रुंदी आक्रसू लागली पण असे जरी असले तरी “घर” या संकल्पनेतच बदल झालाय असे मला वाटत नाही. घर म्हणजे दरवाजे, खिडक्या, भिंती, छत याचबरोबर बैठकीची खोली, शयनगृह, स्वयंपाकघर,अभ्यासखोली, स्वच्छतागृह वगैरै वगैरे. घराच्या अशा प्राथमिक आराखाड्यातही घरातले संस्कृतीपूजक देव्हाऱ्यासाठी अगदी शक्य असेल तर वास्तुशास्त्रानुसार एखादी तरी लहान-मोठी जागा ठरवतातच कारण घरातला हाच एक कोपरा म्हणजे घरातलं सर्वात पवित्र स्थान असतं. सुख, शांती आणि समृद्धीचे ते केंद्र असते. एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मक लहरींचा उगम तिथून होत असतो.
घरातून देवघर वजा झाले तर घर या संकल्पनेचा अर्थ बदलून जाईल. ते घर नसून केवळ राहण्यासाठीचं एक लाॅज ठरेल.घराची व्याख्या अपूर्ण राहील. आध्यात्मवजा स्मशानवत असं ते घर भासेल.
अर्थात समाजात देव मानणारे, देव न मानणारे, आस्तिक, नास्तिक, अजिबात धार्मिकतेला महत्त्व न देणारे, ज्यांना घरातल्या देवघरात रोजच्या रोज होणाऱ्या पूजेबद्दल, भक्ती भावाने उजळवलेल्या निरांजन समयीच्या प्रकाशातील शक्तीविषयी जाणून घेणेही गरजेचे न वाटणारे, मूळातच या सगळ्याच गोष्टींना अंधश्रद्धा, अवडंबर अथवा थोतांड या सदरात घालून आम्ही कसे तत्त्वज्ञ, तार्किकतेला मानणारे बुद्धीवादी आहोत असे समजणारे, घरात देवघर असायची गरजच काय अशा पद्धतीने विचार करणारे लोकही आहेत.
मान्य आहे देव देव्हार्यात नाही, देवालयात नाही, देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, देव शोधुनिया पाही देव सर्वाभूतां ठायी..
संतांनी सुद्धा देव आहे ही संकल्पना मांडली,त्याची स्वरूपे आणि त्याच्या अस्तित्वाविषयी भाष्य केले पण सामान्य प्रापंचिक माणूस यथाशक्ती यथामती श्रद्धेच्या माध्यमातून कुठेतरी ईश्वरी अंशाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यातून त्याला मानसिक शांती, ताणतणाव दूर करण्याचे एक साधन मिळतं. अशासाठी घरातलं देवघरच त्याचं शक्तीपीठ असतं. तेच जर नाकारलं, वजा केलं अथवा अनावश्यक ठरवलं तर त्याचे जीवन अत्यंत कोरडं, विराण, ओसाड होऊन जाईल. मनातली हिरवळच सुकून जाईल आणि पर्यायाने देवघर नसलेल्या घरातली व्यक्ती करुणा, भक्ती, प्रेम, एकात्मता, सहअनुभूती, संवेदना या उच्चतम गुणस्त्रोतांपासून फारकत घेतलेलीच भासेल.
क्षणभर विचार करा घरात देव्हारा नाही म्हणजे एक लहान मोठं कसंही पण सुंदर कळस असलेलं, सुबक कोरीव काम असलेलं, लाकडी किंवा संगमरवरी मंदिर नाही. त्यात भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा करून मांडलेले ज्याची त्याची भक्तीस्थानं म्हणजे गणेश, विठ्ठल -रखुमाई, शंकर, गोविंद,राम किंवा तत्सम प्रार्थनीय मूर्ती अथवा छायाचित्रंही नाहीत. प्रेमभावाने वाहिलेल्या सुंदर सुवासिक रंगीबेरंगी फुलांची सजावट नाही, उदबत्तीचा सुगंधी दरवळ नाही, शांत जळणार्या दिव्याचा मंद ऊर्जादायी उजेड नाही, मंत्रोच्चार नाहीत, स्तोत्रपठण नाही, घंटानाद नाही, नमस्कार प्रणामाची एक लीन, नम्र भावनेची कृतीही नाही. भेगाळलेल्या धरणीला जशी पर्जन्यधारांची गरज असते तेव्हा ती फुलते, फळते, हरित होते, माणसाचं मनही असंच अनेक प्रापंचिक समस्यांमुळे भेगाळलेलंच असतं ना? मग देव आणि देवघर या कल्पनेला मनोमन स्मरून विनासायास,विनायातायात, अवडंबर अथवा श्रद्धेचा विपर्यास न करून केलेली ही अत्यंत साधी सोपी अशी एक सुंदर मनावरची उपचार पद्धती आहे जी मनाला सदैव ताजे, टवटवीत प्रसन्न ठेवू शकते. नकारात्मकतेपासून दूर जाऊन आशावादी बनवते, एक आंतरिक बळ प्राप्त करून देते, विश्वास देते, जगण्यासाठी ऊर्जा देते आणि पर्यायाने जगणंच सुंदर करते.
प्रापंचिक माणसाचा देव हा बहुतांश सगुण असतो. त्याच्या कल्पनेत ठाम रुजलेली एक देवाची मनुष्याकृती असते. या मनुष्यकृतीत भलेही कधी फॅन्टसी आढळते पण त्याच आकृतीला मनानेच शक्तीपीठाचा आणि पर्यायाने बलस्थानाचा दर्जा नकळत दिला जातो. कुठल्यातरी अंतरिक भावनेने त्यातलं देवपण, देवत्व मानलं जातं आणि असं स्थापित देवत्व म्हणजेच देवाचं घर..देवघर.पावित्र्य,मांगल्य जपणारं स्थान.
खरं म्हणजे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जसे की दुकाने, हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये, ऑफिसेस, हॉटेल्स येथे भावात्मकतेने स्थापित केलेली देवघरे असतात आणि तिथे जाणारी बहुतांश मंडळी सर्वसाधारणपणे प्रतिक्षिप्तपणे चटकन नमस्कार करतातच.वाहनातून प्रवास करतानाही रस्त्यात एखादं मंदिर दिसलं तरी आपले हात नकळत जुळतात. इथे जाणवतो तो संस्कृतीचा, संस्कारांचा परिणाम. यात कसलीही अंधश्रद्धा नसते. ही एक आध्यात्मिक कृतिशील थेरेपी आहे जी माणसाचं जगणं सुसह्य करू शकते.
आजच्या तांत्रिक, प्रगत, विकसित युगात सुद्धा याचं मोल अबाधित आहे आणि तसं ते सिद्धही झालेलं आहे जेव्हा तुम्ही मंदिरातल्या देवदर्शनासाठी केलेल्या भल्या मोठ्या रांगा बघता, तीर्थक्षेत्री उसळलेली गर्दी अनुभवता तेव्हा मनुष्य जीवनासाठीची एक गरज जाणवते. त्यातला दांभिकपणा ,भोळसटपणा दुर्लक्ष करून मन:शक्ती मिळवण्यासाठीची धडपड मात्र तिथे नक्कीच जाणवते.
“आमच्या घरात देवघरच नाही” असं मोठं फुशारकीनं आणि आपण कुणीतरी वेगळे आहोत, हा अहंकार आणि दुराग्रही बनून भाष्य करणाऱ्या लोकांची मला म्हणून फक्त कीवच करावीशी वाटत नाही तर त्यांची मला दयाही येते.एकप्रकारे ही माणसंसुद्धा दांभिकच असतात.
घरातल्या एका प्रसन्न, आनंददायी सजावटीचा कोपराच नष्ट केलेल्या या माणसांच्या सौंदर्यदृष्टीबद्दलही मला शंका येते.
देवघर नसलेलं घर म्हणजे एखादं डौलदार पण निष्पर्ण, रुक्ष झाड असेच मी म्हणेन. सावली न देणारं भयाण भासणारं मृतवत् झाड!
*राधिका भांडारकर*
