*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंगजी कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*आपण कसे असावे?*
हे जग, हे विशाल विश्व आणि त्यात वावरणारे आपण सर्वजण—मनुष्यप्राणी, किंबहुना जीवात्मे आहोत. कारण शरीर आणि आत्मा यांच्या संयोगातूनच जीवात्म्याची निर्मिती होते. तरीही एक प्रश्न सतत मनात डोकावत राहतो—आपण खरोखर आनंदी, सुखी आणि समाधानी का राहत नाही?
आजूबाजूला पाहिलं तर बऱ्याच वेळा, बऱ्याच ठिकाणी लोक नकारात्मकतेची घंटा वाजवत असल्याचेच दिसते. तक्रारी, असमाधान, निराशा यांतच अनेकांचे जीवन अडकलेले जाणवते. हे असे का घडते?
याची कारणे अनेक आहेत—अज्ञान, स्वची ओळख नसणे, अध्यात्मिकतेचा अभाव, जीवनमूल्ये न समजणे किंवा समजून न घेण्याची वृत्ती. या सगळ्यांना एकत्रितपणे आपण अभाव संस्कार असे म्हणू शकतो.
संस्कार हा मुद्दा आपल्या जीवनाच्या घडणीत फार मोठी भूमिका बजावतो.
आपण जरा थांबून विचार केला, तर लक्षात येईल की दिवसभरात आपण असंख्य विचार करतो—आणि त्यातील बहुसंख्य विचार नकारात्मक असतात. हेच विचार जर सात्विकतेने, सकारात्मकतेने आणि अध्यात्मिक जाणिवेतून केले, तर आपले जीवन निश्चितच अधिक आनंददायी, सफल, यशस्वी, सुखी आणि समाधानी होऊ शकते.
ही ऊर्जा आपल्या आत असते, हे माहित असूनही आपण ती योग्य दिशेने का वळवत नाही, याचा गंभीर विचार करण्याची गरज आहे. कारण असा विचारच जीवनाला खऱ्या अर्थाने सार्थक करतो.
हे सर्व साध्य होण्यासाठी आपल्याला योग्य संगत हवी—सद्वर्तन करणाऱ्या, सकारात्मक विचारांच्या लोकांची. नियमित सत्संग, चांगल्या विचारांचे वातावरण आणि सात्विक जीवनशैली यांचा सहवास अत्यंत महत्त्वाचा आहे. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून शक्यतो चार हात दूर राहावे. आणि जर नाईलाजाने त्यांच्याशी संबंध ठेवावा लागला, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक बाजूच पाहावी. तीच अधोरेखित करावी.
त्यांना न दुखावता, त्यांच्यातील थोडेफार गुण ओळखून त्यांचे कौतुक करावे. कदाचित त्यामुळे त्यांच्याही विचारसरणीत सकारात्मक बदल घडू शकतो. नकळतपणे घडलेली ही एक पुण्यकर्माची पायरी ठरू शकते.
मोठ्यांमध्ये मोठ्यासारखे, मध्यमवर्गीयांमध्ये त्यांच्यासारखे आणि लहानांमध्ये लहान होण्याची कुशलता अंगी बाळगली, तर जीवन अधिक सहज आणि आनंदी होते.
प्रत्येक माणसाकडे एखादा तरी छंद असायलाच हवा. छंद माणसाला कधीही कंटाळवाणा किंवा उदास होऊ देत नाही. तसेच, नाईलाज सोडता शक्य तितका काळ जीवनाच्या शेवटपर्यंत स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्वची ओळख होणे अत्यंत गरजेचे आहे.
मी कोण आहे?
मी या जगात का आलो?
माझ्या जन्माचे उद्दिष्ट काय?
या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे आणि त्यानुसार आपले वर्तन घडवले पाहिजे. “मी शरीर नसून आत्मा आहे” ही जाणीव होणे म्हणजेच अध्यात्मिक प्रवासाची सुरुवात. या प्रवासात तमोगुण कमी करत, सात्विकतेकडे सातत्याने वाटचाल करत राहिले पाहिजे.
आपले वागणे, बोलणे आणि विचार इतके स्वच्छ, कल्याणकारी असावेत की इतरांना आपली सहवासाची ओढ वाटावी. गरजूंची मदत करावी, थोरामोठ्यांचा आदर ठेवावा, आणि जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा—मात्र त्याचा दिखावा टाळावा.
दान, मदत, सल्ला किंवा मार्गदर्शन सहजतेने करावे; त्याचा गवगवा करू नये. कारण त्यातून अहंकार वाढण्याची शक्यता असते.
“एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये,” ही उक्ती इथे अत्यंत सार्थ ठरते.
म्हणूनच म्हणतात—
देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे;
घेता घेता घेणाऱ्याने,
देणाऱ्याचे हात घ्यावे!
असे वर्तन पुण्यदायी असते. ते निष्काम कर्म ठरते आणि आपल्याला मुक्तीच्या दिशेने घेऊन जाते. मुक्ती हेच मनुष्यजन्माचे अंतिम उद्दिष्ट आहे.
आपले जीवन सुंदर, आनंदी आणि अर्थपूर्ण कसे राहील, याकडे आपला कल असला पाहिजे. त्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा सात्विकतेने वाढते. लोक आपल्याकडे आपुलकीने पाहतात, आपले मार्गदर्शन स्वीकारतात. यामध्येच खरे सामाजिक सौख्य सामावलेले आहे.
चला तर मग, आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत, अशा प्रकारचे जीवन जगण्याचा संकल्प करूया आणि आपल्या वर्तनातून समाज अधिक समृद्ध करण्याचा विडा उचलूया.
—
*पांडुरंग वसंत कुलकर्णी नाशिक / मुंबई*
