You are currently viewing माजगाव पंचायत समितीत ‘मराठा एकजूट’चा राजकीय स्फोट
Oplus_16908288

माजगाव पंचायत समितीत ‘मराठा एकजूट’चा राजकीय स्फोट

अन्यायाविरोधात आबा सावंत मैदानाबाहेर; जितेंद्र गांवकरांना बिनशर्त पाठिंबा

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील माजगाव पंचायत समिती निवडणूक सध्या चांगलीच रंगात आली असून, खुल्या प्रवर्गाची जागा असताना ऐनवेळी एका ज्येष्ठ भाजप पदाधिकाऱ्याच्या हट्टामुळे इतर मागासवर्गीय उमेदवार लादण्यात आल्याने मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोषातूनच माजगाव पंचायत समितीत मोठी राजकीय उलथापालथ घडून आली आहे.

मराठा समाजावर झालेल्या या अन्यायाविरोधात अपक्ष उमेदवार आबा सावंत यांनी थेट निवडणूक रिंगणातून माघार घेत आपला स्पष्ट निषेध नोंदवला. याचवेळी त्यांनी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व अपक्ष उमेदवार जितेंद्र गांवकर यांना जाहीरपणे बिनशर्त पाठिंबा दिला.

या घडामोडींमध्ये वेत्त्येचे उपसरपंच गुणाजी गावडे यांनी निर्णायक ‘किंगमेकर’ भूमिका बजावली. “आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकच उमेदवार उभा करूया आणि झालेल्या अन्यायाची परतफेड विजयातून करूया,” या भूमिकेतून ‘फक्त मराठा’ या एकसूत्री लढ्याखाली जितेंद्र गांवकर यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.

पत्रकार परिषदेत आबा सावंत यांनी ठाम शब्दांत भूमिका स्पष्ट करत सांगितले,

“समाजावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. माझे धडाडीचे मित्र जितेंद्र गांवकर यांना मी पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा देत आहे.”

या राजकीय निर्णयामुळे माजगाव पंचायत समिती निवडणुकीला नवे वळण मिळाले असून ‘मराठा ट्रम्प कार्ड’ निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान, आबा सावंत यांच्या पाठिंब्यामुळे आपली ताकद अधिक बळकट झाल्याचे सांगत अपक्ष उमेदवार जितेंद्र गांवकर यांनी, “आबा सावंत यांनी दाखवलेल्या विश्वासाचा आणि मानसन्मानाचा कधीही भंग होऊ देणार नाही,” असे स्पष्ट केले व त्यांचे मनापासून आभार मानले.

यावेळी वेत्त्येचे सरपंच गुणाजी गावडे, अपक्ष उमेदवार जितेंद्र गांवकर, आबा सावंत, गुरुदास गांवकर, गोविंद गावडे, तन्मय पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा