शाहूवाडी (कोल्हापूर) येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजन; वैदिक मंत्रोच्चारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा राज्याभिषेक, शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशाळगड येथे शाहूवाडी (कोल्हापूर) येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास हिंदुत्ववादी नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
विशाळगडाच्या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा वैदिक मंत्रोच्चारात विधिवत राज्याभिषेक करण्यात आला. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षणाचे साक्षीदार होताना उपस्थित शिवभक्तांमध्ये अभिमान, श्रद्धा आणि स्वराज्याप्रती निष्ठेची भावना अधिक दृढ झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे केवळ राज्य नसून स्वाभिमान, न्याय, धर्मरक्षण आणि रयतेच्या कल्याणासाठी उभारलेले आदर्श शासन होते, असे सांगितले. शिवरायांचे विचार, त्यांचा त्याग आणि राष्ट्रकार्य प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी मानवंदना असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
“जिथे जिथे भगवा फडकतो, तिथे तिथे शिवरायांचे विचार जिवंत राहतात,” या संदेशाने भारावलेल्या वातावरणात उपस्थितांनी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण विशाळगड परिसर दुमदुमून सोडला. उत्साह, भक्तिभाव आणि स्वराज्यनिष्ठेच्या वातावरणात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
