पहाटे शहरात रानगव्यांचा धसका; शिरोडा नाका परिसरात पाच गव्यांचा मुक्त संचार
सावंतवाडी
शहरातील भर वस्तीत आज पहाटे रानगव्यांच्या कळपाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये भीती आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. शिरोडा नाका येथील वृंदावन सोसायटी परिसरात पहाटे साडेतीन ते सहा वाजेदरम्यान पाच रानगव्यांचा कळप मुक्तपणे वावरताना दिसून आला.
पहाटेच्या शांततेत रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांमध्ये फिरणाऱ्या गव्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी घराबाहेरूनच गर्दी केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसले, तरी भर वस्तीत रानगव्यांचे दर्शन होणे ही अलीकडच्या काळातील मोठी आणि दुर्मिळ घटना मानली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून, वनविभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. रानगव्यांचा कळप नंतर परिसरातून जंगलाच्या दिशेने निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
