You are currently viewing आरोंद्यात राजकीय रणधुमाळी; सुदन कवठणकरांच्या प्रचाराला गावोगावी प्रतिसाद
Oplus_16908288

आरोंद्यात राजकीय रणधुमाळी; सुदन कवठणकरांच्या प्रचाराला गावोगावी प्रतिसाद

डोअर-टू-डोअर प्रचारातून जनसंवाद, विकासाअभावी नाराजीचा सूर आणि विजयाचा ठाम विश्वास

सावंतवाडी :

आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुदन कवठणकर यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून निवडणूक रिंगणात मोठी मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. डोअर-टू-डोअर प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत थेट पोहोचत असताना त्यांना गावोगावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आरोंदा येथे महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना कवठणकर यांनी विद्यमान सदस्यांवर तीव्र टीका केली. मागील पाच वर्षांत या भागात कोणतेही ठोस विकासकाम झाले नसून अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. फक्त आश्वासनांच्या जोरावर मते घेण्याचे राजकारण जनता आता सहन करणार नाही आणि योग्य वेळी चपराक देईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

यावेळी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन कवठणकर यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली. भाषणात त्यांनी सांगितले की, परिसरातील अनेक विकासकामे रखडलेली असून आरोग्य व रोजगाराचे प्रश्न अत्यंत गंभीर झाले आहेत. निवडून आल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला.

आपल्याला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही; मात्र गेल्या पाच वर्षांत ठोस कामे न झाल्यामुळे जनतेमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे उमेदवार आपण राणे यांचे असल्याचा गैरसमज पसरवत असल्याचा आरोप करत, संबंधित उमेदवारांचा पक्षाशी कोणताही संबंध नसून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याचेही कवठणकर यांनी सांगितले.

डोअर-टू-डोअर प्रचारादरम्यान मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून मतदारांशी संवाद साधला जात असून, या थेट जनसंपर्कामुळे प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. येत्या १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपलाच विजय निश्चित असून विजयाचा गुलाल आमचाच उधळला जाईल, असा ठाम विश्वास यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही आमिषाला बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन कवठणकर यांनी जनतेला केले. यावेळी आरोंदा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहत प्रचारात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

प्रतिक्रिया व्यक्त करा