भाजप–शिवसेना (शिंदे गट)–राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन
सावंतवाडी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मळगाव येथे भाजप, शिंदे गटाची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महायुती) यांच्या संयुक्त संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या हस्ते फीत कापून या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याला नेमळे येथील माजी सरपंच विनोद राऊळ, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीप गावडे, मळगाव–नेमळे पंचायत समिती उमेदवार गौरव मुळीक, शक्ती केंद्रप्रमुख गणेशप्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य व विभागप्रमुख लक्ष्मण गावकर, माजी सरपंच निलेश कुडव, नीलकंठ बुगडे, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ, सदस्य निकिता राऊळ, अनुजा खंडपकर, बूथ अध्यक्ष महेश गवंडे, सुदेश राऊळ, मदन तेंडोलकर, रोहेश सावंत, सुभाष देवळी यांच्यासह भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी भाजप पक्षात शिक्षणाला दिले जाणारे विशेष महत्त्व अधोरेखित केले. सामान्य कार्यकर्त्यालाही पक्षात सन्मान व संधी मिळते, असे सांगत येथील दोन्ही महायुतीचे उमेदवार उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी तळवडे जिल्हा परिषद उमेदवार संदीप गावडे यांनी प्रचारासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांचे आभार मानले. तसेच संपर्क कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाश सबनीस यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
