You are currently viewing नेरूर पंचक्रोशीत ‘ग्राम विकास आघाडी’ची दमदार एन्ट्री; महायुतीविरोधात स्थानिकांची एकजूट
Oplus_16908288

नेरूर पंचक्रोशीत ‘ग्राम विकास आघाडी’ची दमदार एन्ट्री; महायुतीविरोधात स्थानिकांची एकजूट

रुपेश पावसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ; स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे रणांगण तापू लागले असून राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘नेरूर पंचक्रोशी ग्राम विकास आघाडी’ या नव्या पॅनलची घोषणा करत निवडणूक लढतीत थेट उडी घेतली आहे.

गुरुवारी नेरूर येथील ग्रामदैवत श्री देव कलेश्वर मंदिरात श्रीफळ अर्पण केल्यानंतर नेरूर चव्हाटा येथे प्रचाराचा कार्यालयाचा अधिकृत शुभारंभ माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अतुल बंगे, शेखर गावडे, कुणाल कुणाल किनळेकर, राजन खोबरेकर, प्रदीप नाईक, विजय लाड, दाजी गावडे, मंजू फडके, रुपेश वाड्येकर, शामा परब, सुशील चिंदरकर, प्रसाद गावडे, आदीसह ठाकरे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“दरवेळी तेच जुने चेहरे पुढे येतात. मात्र यावेळी नव्या दमाच्या, काम करणाऱ्या उमेदवारांना संधी मिळावी, या हेतूने ग्राम विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे,” असे मत माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले. नेरूर पंचक्रोशीतील जनभावना आणि उमेदवारांची जनशक्ती लक्षात घेता या पॅनलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पॅनलतर्फे जिल्हा परिषदेसाठी रुपेश पावसकर, तर पंचायत समितीसाठी अर्चना बंगे आणि दीप्ती नाईक (उबाठा गट पुरस्कृत) रिंगणात आहेत.

“नवे चेहरे, नवा विकास” हाच आमचा अजेंडा असून स्थानिकांशी असलेला थेट संपर्क आणि गेल्या काही वर्षांत केलेली सामाजिक कामे आमच्या विजयाचा पाया ठरतील, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

रुपेश पावसकर म्हणाले, आपल्या मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा असून ठाकरे शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आपण लढणार आणि जिंकणारही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा