कणकवलीत आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली
कणकवली
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवार, दि. 29 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथे कै. अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
या आदरांजली सभेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वपक्षीय आजी-माजी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच सहकार, कृषी, कला, क्रीडा, उद्योग, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी, डॉक्टर, वकील, पत्रकार, शिक्षण क्षेत्रातील मंडळी आणि कणकवली शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष संदेश भास्कर पारकर यांनी केले आहे.
राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या अजितदादा पवार यांच्या निधनाने सर्वसामान्यांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी कणकवली शहरात आयोजित या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
