*इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत देशभक्तिपर गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध*
पिंपरी
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘ये दिल हैं हिंदुस्तानी’ या निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर (छोट्या) नाट्यगृहातील देशभक्तिपर गीतांच्या नि:शुल्क सांगीतिक मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. राखी झोपे यांच्या संकल्पनेतून आणि अनिल झोपे यांच्या संयोजनातून ‘गाता रहे मेरा दिल’ या उपक्रमांतर्गत सादर करण्यात आलेल्या या ४५व्या विशेष सांगीतिक मैफलीत देशभक्तीचा परिपोष करण्यात आला. त्यासाठी मनगटावर खास तिरंगी रिस्टबँड परिधान केलेल्या राजकुमार सुंठवाल, प्रमोद शर्मा, गणेश ओहाळ, सागर पाटील, शहाजी कांबळे, मंगेश उंबराणी, अमित पांचाळ, नीलेश मोरे, दत्तात्रय कुंभार, कविता शाह, माधवी पोतदार, रूपाली मिरासदार, प्रशांत कुलकर्णी, दीपा कोंडलेकर या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील गीतांचे एकाहून एक सुरेल नजराणे पेश केले. विशेषत: बहुतांश गीतांना दमदार कोरसची स्वरसाथ लाभली.
‘संदेसे आते हैं…’ , ‘जहाँ डाल डाल पें…’ , ‘फिर भी दिल हैं हिंदुस्तानी…’ , ‘मेरा जुता हैं जपानी…’ , ‘मेरे प्यारे वतन…’ , ‘कितना सोणा हैं देश मेरा…’ , ‘भारत हमको जानसे प्यारा हैं…’ , ‘हर करम अपना करेंगे…’ , ‘ये देश हैं वीर जवानोंका…’ , ‘मेरे देश की धरती…’ , ‘इन्साफ की डगरपें…’ , ‘मेरे देशप्रेमीयों…’ , ‘ए मेरे वतन के लोगों…’ , ‘छोडो कल की बातें…’ , ‘कर चले हम फिदा…’ , ‘देश रंगीला…’ , ‘हैं प्रीत जहाँ की रीत सदा…’ , ‘दुल्हन चली…’ , ‘चिठ्ठी आयी हैं…’ अशा वैविध्यपूर्ण देशभक्तिपर गीतांना भरभरून दाद देताना ‘वन्स मोअर’ची मागणी करीत श्रोते टाळ्यांसह उत्स्फूर्तपणे ‘भारतमाता की जय!’ असा जयघोष करीत होते. ‘ने मजसी ने मजला…’ आणि ‘शूर आम्ही सरदार…’ या मराठमोळ्या गीतांनी श्रोत्यांना सद्गदित केले. उत्तरोत्तर रंगलेली ही मैफल संपूच नये असे वाटत असतानाच ‘जिंदगी मौत ना बन जाये…’ या वीरश्रीपूर्ण गीताने मैफलीचा समारोप करण्यात आला; तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान मणिपूर येथील एका बेटावरील तरंगत्या गावासाठी मदतनिधी संकलनाचे आवाहन करण्यात आले आणि त्याला उपस्थितांचा भरघोस प्रतिसाद लाभला. म्युझिक व्हिजनने ध्वनिसंयोजन केले. विक्रम क्रिएशन्सने दृकश्राव्यचित्रण केले. आकाश गाजूल यांनी छायाचित्रण केले. मनीष गोखले यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
