नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावेत तसेच या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी यासाठी नंदुरबारच्या महात्मा फुले फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पालक शिक्षक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे भाषणांचे सर्व रेकॉर्ड तोडणारे मिशन आयएएस या संस्थेचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांना निमंत्रित केले आहे. त्यांचा मी आयएएस अधिकारी होणारच हा कार्यक्रम नंदुरबार येथे सुप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 30 जानेवारीला दुपारी 3 वाजता संपन्न होणार आहे .हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून नंदुरबार शहरात राहणाऱ्या नागरिकांनी अध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा फुले फाउंडेशन नंदुरबार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे .
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे मिशन आयएएस ह्या भारतातील सुप्रसिद्ध संस्थेचे संचालक असून त्यांनी आतापर्यंत संपूर्ण भारतात 18178 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतलेल्या आहेत. याशिवाय त्यांनी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी एकूण 73 पुस्तके लिहिलेली आहेत .मिशन आयएएस या स्पर्धा परीक्षा विषयक चळवळीमध्ये आतापर्यंत 373 आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकारी प्रत्यक्ष मार्गदर्शन करायला आलेले आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून ते संपूर्ण भारतात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेत असून या मिशन तर्फे फक्त एक रुपया प्रतिदिन इतक्या अल्पशुल्कामध्ये मुलांना दुसऱ्या वर्गापासून मराठी व इंग्रजी भाषेतून स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते .शिवाय या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांसाठी पुस्तके टेस्ट सिरीज ही देखील विनामूल्य असते.
नंदुरबार हा महाराष्ट्रातील दुर्लक्षित जिल्हा आहे .शिवाय हा भाग स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत बराच मागे आहे आणि म्हणून महात्मा फुले फाउंडेशन ने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये स्पर्धा परीक्षा जनजागृती अभियान आयोजित केले आहे .विशेष म्हणजे या अभियानाची सुरुवात नंदुरबार पासून होत असून राष्ट्र पिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी ला म्हणजे 30 जानेवारीला दुपारी 3 वाजता मी आय ए एस अधिकारी होणारच या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आपल्या आदिवासी भागातील श्री राजेंद्र भारूड सारखा मुलगा विपरीत परिस्थिती मधून आयएएस अधिकारी होऊ शकतो. तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्याचा संकल्प महात्मा फुले फाउंडेशनने सोडला असून त्या दृष्टिकोनातून त्यांनी सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांना एका आठवड्यासाठी नंदुरबार येथे निमंत्रित केले आहे.
मिशन आयएएस ही नामवंत संस्था असून या संस्थेचे जाळे भारतातील एकोणीस राज्यात पसरलेले आहे. कुठल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता मिशन आयएएस संपूर्ण भारतात काम करीत आहे.
नंदुरबार जिल्ह्यासाठी मिशनने पुढाकार घेणाऱ्या महात्मा फुले फाउंडेशनला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून त्या दृष्टिकोनातून संस्थेचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे 26 ते 31 जानेवारी या दरम्यान नंदुरबार येथे तसेच नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध महाविद्यालयात विविध विद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती महात्मा फुले फाउंडेशनच्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.
शांतीलाल महाजन
महात्मा फुले फाउंडेशन
नंदुरबार
