You are currently viewing लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार ‘भारत पर्व 2026’

लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार ‘भारत पर्व 2026’

लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार ‘भारत पर्व 2026’

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दालनासह ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’

चित्ररथाचे असणार विशेष आकर्षण

नवी दिल्ली

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी  भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे 26 ते 31 जानेवारी या कालावधीत लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी  विनामूल्य प्रवेश असून, 26 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते रात्री 9 आणि 27 ते 31 जानेवारी या काळात दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत सुरु राहील.  या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) भव्य दालन असून, याद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध पर्यटनाचे आणि ऐतिहासिक वारशाची माहिती देण्यात येणार आहे.

या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलनात सहभागी झालेला महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भर भारताचे प्रतीक’ हा देखणा चित्ररथ. हा चित्ररथ प्रदर्शनासाठी लाल किल्ला परिसरात विशेष स्थानी ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा लाडका उत्सव असलेला ‘गणेशोत्सव’ हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो स्थानिक कलाकारांना, मूर्तिकारांना आणि लघुउद्योगांना कशाप्रकारे बळ देतो, म्हणजेच ‘आत्मनिर्भर भारताचे’ एक जिवंत प्रतीक कसे आहे, याची प्रभावी मांडणी या चित्ररथातून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) या दालनामध्ये पर्यटकांना राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळे, अथांग कोकण किनारपट्टी, ऐतिहासिक गड-किल्ले, अध्यात्मिक वारसा आणि व्याघ्र प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. राज्यातील विविध पर्यटन केंद्रांवरील निवासाच्या सोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन पॅकेजेसची माहिती देण्यासाठी येथे स्वतंत्र कक्ष कार्यरत असेल.

या महोत्सवात पर्यटकांना ‘पॅन इंडिया फूड कोर्ट’च्या माध्यमातून विविध राज्यातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल. यासोबतच हस्तशिल्प आणि हातमाग बाजारात विणकरांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू उपलब्ध असणार आहेत. सहा दिवसांच्या या उपक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, सशस्त्र दलांचे बँड वादन आणि ‘डिजिटल इंडिया’चे प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांची  रेलचेल असेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा