सावंतवाडी / बांदा :
जिल्ह्यातील महत्त्वाच्या बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रमोद कामत हे बिनविरोध निवडून आले आहेत. बांदा शहर विकास आघाडीचे उमेदवार सुशांत पांगम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.
बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात प्रमोद कामत यांची संपूर्ण मतदारसंघावर मजबूत पकड असल्याने त्यांचा विजय आधीपासूनच निश्चित मानला जात होता. सुरुवातीला बांदा शहर विकास आघाडी स्थापन करून सुशांत पांगम यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र परिस्थितीचा आढावा घेत अखेर सुशांत पांगम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
त्यामुळे निवडणूक बिनविरोध होऊन प्रमोद कामत यांची जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रमोद कामत यांच्या या बिनविरोध विजयाबद्दल जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
