You are currently viewing कणकवलीत भाजपाचा ‘दे धक्का’ तंत्राचा प्रभाव

कणकवलीत भाजपाचा ‘दे धक्का’ तंत्राचा प्रभाव

कणकवलीत भाजपाचा ‘दे धक्का’ तंत्राचा प्रभाव; खारेपाटण जि.प. मतदारसंघात प्राची इस्वलकर बिनविरोध

ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांची माघार; तालुक्यात भाजपाचे चार उमेदवार बिनविरोध

कणकवली

कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे शिवसेनेला सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का देण्यात आला आहे. खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने भाजपाच्या उमेदवार प्राची इस्वलकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
या घडामोडीमुळे कणकवली तालुक्यात भाजपाच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या आता तीनवरून चार झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांचे चर्चेत असलेले “दे धक्का तंत्र” मतदारसंघातच नव्हे तर राज्यभरात राजकीय चर्चेचा विषय ठरत असून, मीनल तळगावकर यांच्या माघारीमुळे ठाकरे शिवसेनेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्यामुळे आज शनिवार असूनही निवडणूक कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. दुपारी 3 वाजेपर्यंत आणखी कोण उमेदवार माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कालच या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार उज्वला चिके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.
त्यानंतर आज ठाकरे शिवसेनेच्या मीनल तळगावकर यांनीही माघार घेतल्याने खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघात प्राची इस्वलकर या एकमेव उमेदवार शिल्लक राहिल्या. त्यामुळे भाजपाच्या ‘धक्का तंत्रा’चा मोठा फटका 27 जानेवारी या शेवटच्या दिवशीही बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा