महिलांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छतागृह पुन्हा सुरू करण्याचा किंवा नव्याने उभारणीचा लवकरच निर्णय
सावंतवाडी :
सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच पार्किंगला अडथळा होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी आज केले. शहरात सत्ताधारी पक्ष भाजपाचा असल्याने यापुढे कोणालाही त्रास होणार नाही. मात्र व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे; यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महिलांची गैरसोय लक्षात घेता पालिकेच्या मागील बाजूस असलेले स्वच्छतागृह पुन्हा सुरू करणे किंवा त्या ठिकाणी नवे स्वच्छतागृह उभारणे याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
पालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुल परिसरातील व्यापाऱ्यांना शौचालयाची समस्या जाणवत होती. पर्यायी व्यवस्था म्हणून बाळकृष्ण कोल्ड्रीक्सच्या मागील शौचालय सायंकाळी सात वाजता बंद होत असल्याने व्यापारी व विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत व्यापारी कुणाल श्रृंगारे आणि पुंडलिक दळवी यांनी नगराध्यक्षांचे लक्ष वेधले.
माहिती मिळताच सहकारी नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर आणि प्रतिक बांदेकर यांच्यासह निरवडेकर यांनी स्वच्छतागृहाची पाहणी केली. यावेळी व्यापारी संकुलातील तुटलेल्या फरश्या तात्काळ बसविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पाहणीदरम्यान उपस्थित व्यापाऱ्यांशी चर्चा करताना शौचालयाची समस्या मांडण्यात आली. हा प्रश्न निश्चितपणे सोडविण्यात येईल, असा शब्द देत “आमचा हेतू केवळ तुमची गैरसोय टाळण्याचा आहे. भाजपाचे सरकार आहे; कोणालाही त्रास होणार नाही. तुम्ही फक्त सहकार्य करा, आम्हीही पूर्ण सहकार्य करू,” असा विश्वास निरवडेकर यांनी उपस्थित महिलांना दिला.
