बांद्याच्या युग्धा बांदेकरची राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनासाठी निवड…
बांदा
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ५२ व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन मध्ये बांदा येथील विद्यार्थिनी युग्धा दीपक बांदेकर हिने सहभाग नोंदवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातून केवळ दोन विद्यार्थिनींची निवड झाली असून, त्यामध्ये युग्धा बांदेकर हिचा समावेश आहे. विज्ञान व संशोधन क्षेत्रातील तिच्या नाविन्यपूर्ण विचारांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. युग्धा ही बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेची माजी विद्यार्थिनी असून सध्या सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात दहावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. लहान वयातच तिने वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा व अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडविले आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक व परिसरातून तिचे अभिनंदन होत आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय व्यासपीठावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, भविष्यात ती विज्ञान क्षेत्रात मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यासाठी तीला आई साक्षी बांदेकर व वडील दीपक बांदेकर यांच्यासह शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
