तळवडे जि.प. मतदारसंघात भाजपला धक्का :
प्रमोद गावडे अपक्ष रिंगणात, अंतर्गत नाराजीचा स्फोट
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला असून, पक्षाच्या राजकीय अडचणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे विद्यमान चेअरमन तसेच निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भाजप नेतृत्वाविरोधात उघड बंडाचे पाऊल उचलले आहे.
स्थानिक आणि सक्षम उमेदवारांना डावलून बाहेरून उमेदवार लादल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तळवडे मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपकडून संदीप गावडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष धगधगत होता. आज प्रमोद गावडे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे हा असंतोष उघडपणे समोर आला आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रमोद गावडे म्हणाले की, तळवडे, मळगाव, नेमळे आणि निरवडे यांसारख्या मोठ्या गावांतील स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष करण्यात आले. जनभावना न जुमानता बाहेरचा उमेदवार लादल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा अन्याय सहन न झाल्यानेच अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजवर कट्टर राणे समर्थक म्हणून ओळख असलेल्या प्रमोद गावडे यांनी पक्षाच्या धोरणांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून अन्यायकारक आणि अहंकारी प्रवृत्तीविरोधात असल्याचे सांगत, ती प्रवृत्ती पराभूत केल्याशिवाय थांबणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रमोद गावडे यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक आता अधिक चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार हे निश्चित झाले आहे.
