You are currently viewing माजगावमध्ये बदलाची चाहूल; युवा नेते विक्रांत सावंत रिंगणात

माजगावमध्ये बदलाची चाहूल; युवा नेते विक्रांत सावंत रिंगणात

जिल्हा परिषद निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत

सावंतवाडी :

माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेते विक्रांत सावंत यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची अधिकृत घोषणा केली आहे. आज मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या घोषणेमुळे संपूर्ण मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य, थेट जनसंपर्क आणि पारदर्शक कार्यशैलीमुळे विक्रांत सावंत हे जनतेमध्ये विश्वासाचे नाव बनले आहे. दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यांत कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, आरोग्य, शिक्षण तसेच युवक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे.

“फक्त आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष काम” ही ओळख जपत त्यांनी उभारलेले कार्य आज त्यांच्या उमेदवारीचा मजबूत पाया ठरत आहे. विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यामुळे महायुतीचे अधिकृत व ताकदीचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे येत आहे.

माजगाव मतदारसंघात त्यांच्या कामाचा ठसा, युवकांमध्ये असलेली पकड आणि सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद पाहता, ही उमेदवारी निवडणुकीचे गणित बदलणारी ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विकासाला गती देणारे तरुण नेतृत्व म्हणून मतदारांचा कल विक्रांत सावंत यांच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट दिसत असून, माजगावची लढत आता अधिकच चुरशीची होणार, हे निश्चित मानले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा